Manoj Jarange Maratha Reservation Hunger Strike : मराठा समाजाला आरक्षण मिळावं याकरता मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले असून आजचा त्यांचा १४ वा दिवस आहे. आज कॉक्रोच जनता पार्टीचे अध्यक्ष अभिजीत दिपके यांनीही त्यांची अंतरवली सराटी येथे जाऊन भेट घेतली. या भेटीत त्यांनीही सरकारवर टीका केली असून सरकारला येथे येऊन जरांगेंशी बोलायला हरकत काय आहे? असा थेट प्रश्नच त्यांनी उपस्थित केला. तसंच, मनोज जरांगेंनी आता उपोषण मागे घ्यावं, अशीही विनंती त्यांनी केली.

अभिजीत दिपके म्हणाले, “हे सरकार निर्दयी आहे. एक माणूस इथे उपोषणाला स्वतःसाठी बसला नाहीय. समाजासाठी बसला आहे. मराठा समाजातील मुलांना चांगलं शिक्षण मिळावं, रोजगार मिळावा, यासाठी ते उपोषणाला बसले आहेत. तुम्ही जर मुलांना चांगलं शिक्षण दिलं असतं, रोजगार दिला असतं तर यांना उपोषणाला बसण्याची गरजच बसली नसती. हे तुमचं अपयश आहे, तुम्हाला ज्या गोष्टींसाठी निवडून देण्यात आलंय, लोकांची कामं करण्यासाठी निवडून दिलं आहे. पण तुम्ही त्यांची कामं केली नाहीत. लोकांना तुम्ही वाऱ्यावर सोडलं.”

ते पुढे म्हणाले, “आत्महत्या केलेल्या प्रथमेश देशमुखच्या घरी काल गेलो होतो. २७ वर्षांचा मुलगा अडीच लाखाच्या उधारीसाठी आत्महत्या करतो. त्या मुलाने आत्महत्या करू नये, रोजगार मिळावा, त्यांना सवलती मिळाव्यात, याकरता मनोज जरांगे उपोषणाला बसले आहेत. जरांगे प्रथमेशसारख्या मुलांकरता उपोषण करत आहेत.”

सरकारला येथे यायला हरकत काय?

“निवडून दिलेले मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री काय करत आहेत? तुम्ही तुमच्या मुलांना शिकवायला परदेशात पाठवत आहात. पण इथे ग्रामीण भागातील मुलांना धड शिकायलाही शाळा नाहीय. शहरात जाऊन शिकण्याकरता घरची परिस्थितीही नाही. मग या मुलांनी करायचं काय?” असं अभिजीत दिपके म्हणाले. “मनोज जरांगे यांच्या उपोषणाला १४ दिवस झाले आहेत. दिल्लीतही सोनम वांगचुक यांना २६ दिवस उपाशी ठेवलं होतं. तुम्ही यांनाही उपाशी ठेवणार आहात का? इथे येऊन बोलायला हरकत काय आहे?” असा सवालही त्यांनी विचारला.

“महाराष्ट्राला त्यांची गरज आहे. त्यामुळे त्यांनी उपोषण मागे घेऊन आपल्या प्रकृतीची काळजी घ्यावी”, अशी विनंतही अभिजीत दिपके यांनी मनोज जरांगे यांना केली.

“जर सरकारने ग्रामीण भागातील तरुणांना चांगलं शिक्षण आणि रोजगाराच्या पुरेशा संधी दिल्या असत्या, तर मनोज जरांगे पाटील यांच्यावर आज उपोषण करण्याची वेळच आली नसती. त्यांचे उपोषण हेच दाखवते की लोकांचा आता सरकारवर भरोसाच राहिलेला नाही”, अशी पोस्ट त्यांनी सोशल मीडियावर केली.