Abhijeet Dipke On Pm Modi : सीजेपीचे संस्थापक अभिजीत दिपके यांच्या नेतृत्वात आज (२ ऑक्टोबर) मुंबईत आंदोलन करण्यात आलं आहे. या आंदोलनाच्या माध्यमातून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली आहे. सीजेपीच्या या आंदोलनाला राज्यभरातून मोठा प्रतिसाद मिळाला आहे.
या आंदोलनादरम्यान बोलताना अभिजीत दिपके यांनी पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शाह, निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली आहे. यावेळी अभिजीत दिपके यांनी ‘मेलोडी चॉकलेट’वरून पंतप्रधान मोदी यांना टोला लगावला आहे. ‘मेलोडी चॉकलेटस् खायचे असतील तर खा, पण जनतेने जे काम दिलं ते करा’, असं म्हणत अभिजीत दिपके यांनी पंतप्रधान मोदींवर अप्रत्यक्ष टीका केली.
अभिजीत दिपके काय म्हणाले?
मुंबईतील आंदोलनात अभिजीत दिपके भाषण करत असताना आंदोलकांनी मेलोडी, मेलोडी अशा घोषणा दिल्या. त्यानंतर अभिजीत दिपके यांनी पंतप्रधान मोदी यांना अप्रत्यक्ष टोला लगावला. अभिजीत दिपके म्हणाले की, “मेलोडी खायचे तर खा, त्याच्याशी आम्हाला काही देणंघेणं नाहीये. मात्र, ज्या कामासाठी तुम्हाला जनतेने निवडून पाठवलं आहे, ते काम करा”, अशा शब्दांत अभिजीत दिपके यांनी मोदींना अप्रत्यक्ष टोला लगावला.
‘तुमची खुर्ची धोक्यात’, अभिजीत दिपके यांचा फडणवीसांना इशारा
“मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तुम्ही ३ दिवसच जेलमध्ये टाकायचं बोलले. अन्यथा ३ महिने बोलले असते तर संपूर्ण मुंबई बंद पडली असती. तुमची खुर्ची तर आधीच धोक्यात आहे. तुमच्या खुर्चीचा एक पाय फेव्हिकॉलचा आहे, तर दुसरा पाय फेव्हिस्टिकने चिकटवलेला आहे. कधी तो खुर्चीचा पाय पडेल आणि तुमची खुर्ची जाईल हे सांगता येत नाही”, असा इशारा अभिजीत दिपके यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिला.
‘३ दिवस नाही, ३ महिने जेलमध्ये टाका’ : अभिजीत दिपकेंची फडणवीसांवर टीका
“मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तुम्हाला आमची एक विनंती आहे की तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहात आणि या महाराष्ट्राला काही वारसा आहे. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज यांचा हा महाराष्ट्र आहे. हे तुम्ही विसारले असाल पण आम्ही विसरलो नाही. या महाराष्ट्रात अशा धमक्या दिल्या जात नाहीत. तुम्ही काय बोलले होते, आंदोलन केलं तर जेलमध्ये जावं लागेल. याचा अर्थ आम्हाला जेलमध्ये टाकायचं होतं का? आम्हा सर्वांना जेलमध्ये टाका. देवेंद्र फडणवीस साहेब फक्त ३ दिवस नाही तर ३ महिने जेलमध्ये टाका. जेलमधून बाहेर आल्यानंतर मी पुन्हा ती घोषणा देईन जी तुम्ही द्यायचे. मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन”, असं म्हणत अभिजीत दिपके यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली.
