Abhijeet Dipke on Shiv Sena-BJP Controversy: शिवसेनेच्या (शिंदे) नेत्यांनी कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक दिपकेंची भेट घेतल्यानंतर भाजपा आणि शिवसेनेत वाद निर्माण झाला आहे. या भेटीवरून आरोप-प्रत्यारोप होत असताना यावर दिपके यांनी भाष्य केले आहे. “३० वर्षांच्या मुलाला घाबरण्याची गरज नाही. शिवसेनेचे नेते केवळ शुभेच्छा देण्यासाठी आले होते. आमचे दुसरे काहीही बोलणे झाले नाही. युवकांचा, विद्यार्थ्यांचा मुद्दा उचलला याबद्दल त्यांनी अभिनंदन केले. यात भाजपाला घाबरण्याची काहीही गरज नाही. ईडी, सीबीआय वगैरे सर्व भाजपाकडे आहे, आमच्याकडे काहीही नाही”, अशी प्रतिक्रिया अभिजीत दिपके यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
‘संघाने संविधानावर लेक्चर देऊ नये’
छत्रपती संभाजीनगर येथे माध्यमांशी बोलत असताना अभिजीत दिपकेंना विविध प्रश्न विचारण्यात आले. ज्यावर त्यांनी आपली भूमिका मांडली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते अतुल लिमये यांनी छत्रपती संभाजीनगर येथे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यक्रमात बोलत असताना जंतर-मंतरवर झालेले आंदोलन देशविरोधी आणि लोकशाहीविरोधी असल्याचे म्हटले होते. याबाबत अभिजीत दिपके यांना प्रश्न विचारण्यात आला.
या प्रश्नावर अभिजीत दिपके म्हणाले, ज्या लोकांनी गांधींची हत्या केली, ज्या लोकांनी आयुष्यभर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विरोध केला. त्या लोकांनी आम्हाला संविधानावर लेक्चर देऊ नये.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत हे जेन-झी आणि जेन-अल्फा पिढीशी संवाद साधणार असून ६ ऑगस्ट रोजी याबाबतचा कार्यक्रम मुंबईत होत आहे. यावर प्रश्न विचारला असता अभिजीत दिपके म्हणाले की, उशीर का असेना पण संघाला तरुणांबरोबर संवाद साधावासा वाटत आहे. पण तरुणांनी तरुणांशी संवाद साधला तर योग्य होईल, असे माझे मत आहे. कारण जोपर्यंत तरुण आणि शिक्षित चेहरे पुढे आणले जात नाहीत, तोपर्यंत तरुणांपर्यंत पोहोचता येत नाही.
E20 आंदोलनाला आमचा पाठिंबा
आम आदमी पक्षाकडून आज ई२० इंधनाच्या विरोधात आंदोलन केले जात आहे. यावर बोलत असताना दिपके म्हणाले की, ई२० विरोधात अनेकजण बोलत आहेत. देशात हा मोठा मुद्दा बनला आहे. अनेकांनी हा मुद्दा उचलला आहे. आमच्याही पेजेसवर ई२० वर बोलण्याबाबत विचारले जात आहे. ई२० बाबत जी आंदोलने होतील, त्याला आमचा पाठिंबा आहे. हा कोणत्याही एका पक्षाचा मुद्दा नाही. यामुळे वाहन नादुरुस्त होत असल्याची तक्रार अनेकांनी केली आहे.

प्रशांत किशोर यांना शुभेच्छा
प्रशांत किशोर यांनी बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपाला पराभवाची धूळ चारल्याबद्दल अभिजीत दिपके यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. लोकशाहीत असेच असले पाहिजे. प्रशांत किशोर हे नव्या पिढीचे नेते आहेत. अशाच प्रकारे नव्या लोकांनी पुढे येणे गरजेचे आहे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
