दिल्लीतल्या जंतर-मंतर या ठिकाणी झालेल्या विद्यार्थी आंदोलनाची चर्चा देशभरात रंगली होती. जून महिन्यात सुरु झालेलं हे आंदोलन सीजेपी म्हणजेच कॉक्रोच जनता पार्टीच्या पुढाकाराने सुरु झालं. या आंदोलनाचे दोन प्रमुख चेहरे होते ते म्हणजे कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अध्यक्ष अभिजीत दिपके आणि दुसरा म्हणजे सोनम वांगचुक यांचा. धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला पाहिजे ही प्रमुख मागणी आंदोलकांनी केली होती. जी २५ जुलैला पूर्ण झाली. हा राजीनामा का झाला? याचं उत्तर अभिजीत दिपकेंनी दिलं आहे.
२५ जुलैला धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा
३७ दिवस झालेल्या विद्यार्थी आंदोलनाला २० जुलैच्या नंतर वेगळं वळण लागलं. कारण २० जुलैला या आंदोलनावर जेव्हा पोलिसांनी लाठीचार्ज केला तेव्हा देशभरातून या आंदोलनाला मिळणारा पाठिंबा वाढला. अनेक सेलिब्रिटी, सामाजिक कार्यकर्ते, तसंच समाजातले विविध घटक यांनी या विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा दिला. ज्यानंतर सरकारवरचा दबाव वाढला. १२ वर्षात एकाही केंद्रीय मंत्र्याचा राजीनामा झाला नव्हता. मात्र अखेर या वाढत्या दबावापुढे सरकार नमलं आणि धर्मेंद्र प्रधान यांना २५ जुलै रोजी राजीनामा द्यावा लागला. राजीनाम्यानंतर जंतर-मंतरवर असलेलं आंदोलन मागे घेण्यात आलं. दरम्यान अभिजीत दिपके यांनी प्रधानांचा राजीनामा घेतला गेला कारण तसं झालं नसतं तर पंतप्रधानांचा राजीनामा झाला असता असं वक्तव्य केलं आहे.
धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याबाबत काय म्हणाले अभिजीत दिपके?
सरकारने संवेदनशील होऊन वगैरे धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याचा निर्णय घेतला नाही. दुसऱ्या दिवशीही लाठीचार्ज झाला होता. पोलिसांना मी जाऊन ते सांगितलं होतं की लाठीचार्ज थांबवा. सरकार संवेदनशील वगैरे अजिबात नाही. यांना हेच वाटलं की प्रधानांचा राजीनामा झाला नाही तर पंतप्रधानांचा राजीनामा होईल. पंतप्रधानांना वाचवण्यासाठी धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला दुसरं काहीही कारण नाही. २० जुलैला जी गर्दी आली त्यानंतर सरकारला समजलं की आंदोलन जंतर-मंतर पुरतं मर्यादित नाही. राग पूर्ण देशभरात पसरला आहे. आता जर प्रधानांचा राजीनामा घेतला नाही तर प्रधानांच्या प्रधानांचा राजीनामा होईल हे वाटल्याने राजीनामा घेतला गेला. एबीपी माझाच्या माझा कट्टा या मुलाखत विशेष कार्यक्रमात अभिजीत दिपकेंंची उपस्थिती होती. याच कार्यक्रमात धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर त्यांनी हे भाष्य केलं आहे.
पोलिसांकडून अमानुष लाठीचार्ज करण्यात आला-दिपके
विद्यार्थ्यांवर पोलिसांकडून अमानुष लाठीचार्ज करण्यात आला. मुलींच्या प्रायव्हेट पार्टवर लाठ्या चालवण्यात आल्या. पॅलेट गनचा वापर झाल्याने एका मुलाची दृष्टी जाऊ शकते अशी स्थिती आहे. एका मुलीच्या मानेवर काठी मारली गेली ज्यानंतर ती जागीच बेशुद्ध पडली आणि तिची प्रकृती अजूनही नाजूक आहे. यापेक्षा जास्त वाईट काय असू शकतं? सरकारसाठी वाईट हे असू शकतं की उद्या आपली सत्ता जाईल कारण जनता आपल्या विरोधात जाऊ शकते. माझ्यासाठी पहिल्यापासून विद्यार्थी महत्त्वाचे आहेत.
