Abhijeet Dipke Cockroach Janta Party Protest Shivaji Park: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी मुंबईतील दादर येथील शिवाजी पार्कवर कॉक्रोच जनता पार्टीच्या वतीने आंदोलन पुकारण्यात आले होते. या आंदोलनाला हजारो तरुणांनी हजेरी लावली. द इंडियन एक्सप्रेसने मुंबई पोलिसांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, अंदाजे ४,००० आंदोलक आंदोलनात सहभागी झाले होते. सीजेपीचे संस्थापक अभिजीत दिपके, सह-संयोजक आशुतोष रांका, सौरव दास यांच्यासह संगीतकार विशाल ददलानी, अभिनेते नसीरुद्दीन शाह, अभिनेत्री शबाना आझमी या आंदोलनात सहभागी झाले होते. या आंदोलनातील महत्त्वाच्या घडामोडी मुद्द्यांद्वारे जाणून घेऊ.
हा फक्त ट्रेलर, दिपकेंचा दिल्ली पोलिसांना इशारा
कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी शिवाजी पार्क येथील आंदोलना दरम्यान मुंबई पोलिसांचे कौतुक केले. दिल्लीत जंतर-मंतरवर आंदोलन करताना दिल्ली पोलिसांनी क्रूरता दाखवली होती. सचिन शर्मा यांनी लहान मुलींवर लाठ्या चालवल्या. पण आता आम्ही पुन्हा एकदा जंतर-मंतरवर आंदोलन करणार असून यावेळी तुम्हाला काय करायचे ते करा, असा इशारा दिपके यांनी दिला.
अमित शाहांना दिले आव्हान
अभिजीत दिपके यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना आव्हान दिले. ते म्हणाले, “दिल्लीत पुन्हा एकदा जंतर-मंतर २.० होत आहे. यावेळी लाठीचार्ज करण्याची हिंमत करू नका. तुम्ही २० जुलै रोजी एक चूक आधीच केली आहे. दुसरी चूक केली तर यावेळी तुमचाच राजीनामा घ्यावा लागेल. तुम्हाला गुंडगिरी करायची असेल गृहमंत्री बनू नका तर गुंड बना.”
? Abhijeet Dipke to Amit Shah:
— TEJASH ? (@Tejashyy) October 2, 2026
This time, don’t give orders for a lathi charge.
You have already made one mistake on July 20. If you make the same mistake again, you will be the next one to resign.
If you want to behave like a goon, become one, but don’t be the country’s Home… pic.twitter.com/fMh70wg6YN
‘तीन दिवस काय तीन महिने तुरुंगात राहायला तयार’
शिवाजी पार्कवर जेल भरो आंदोलन करणाऱ्या आंदोलकांना तीन दिवस तुरुंगात टाकले जाईल, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणत होते, अशी माहिती दिपके यांनी यावेळी दिली. पण आम्ही तीन काय तर तीन महिने तुरुंगात राहण्यासाठी तयार आहोत, पण मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा घेतल्याशिवाय मागे हटणार नाही, असा इशारा दिपके यांनी दिला.
‘गांधी भारताचा आत्मा, आंबेडकर कणा आणि नेहरू मेंदू आहेत’
शिवाजी पार्कमध्ये जमलेल्या आंदोलकांना संबोधित करत असताना अभिजीत दिपके यांनी गांधी जयंतीचा उल्लेख केला. ते म्हणाले, ज्यांना वाटत होते की त्यांच्या हत्येमुळे त्यांचा प्रभाव संपेल, ते चुकीचे होते. नथुराम गोडसेच्या विचारसरणीचे अनुयायी गांधींना कधीही संपवू शकणार नाहीत. इथे उपस्थित प्रत्येक आंदोलक गाधींच्या विचारांचा अनुयायी आहे.
दिपके पुढे म्हणाले, महात्मा गांधी भारताचा आत्मा असतील तर आंबेडकर देशाचा कणा आणि नेहरू मेंदू आहेत.
पंतप्रधान मोदींवर दिपकेंची टीका
“भाजपाला कोणत्याही परिस्थिीत निवडणुका जिंकायच्या आहेत. त्यांना वाटते निवडणूक जिंकून ते गांधी-नेहरू-आंबेडकर यांच्यापेक्षा स्वतःला मोठे बनवू शकतील. पण हे महापुरूष त्याग, बलिदानाच्या आधारावर मोठे बनले. आंबेडकर आणि नेहरूंनी भारतीयांना मतदानाचा अधिकार दिला होता. पण हे सरकार अधिकार हिसकावण्याचे काम करत आहे. तुम्ही देशाला किती लुटणार?”, अशी टीका दिपके यांनी केली.
“पंतप्रधान मोदींनी नोटबंदीत जनतेला बँकेच्या रांगेत लावले, करोना काळात लशीसाठी रांगेत लावले, आता मतांसाठी रांग लावा म्हणतात. यांनी फक्त जनतेला रांगेत लावण्याचे काम केले. आमच्या पैशांवर ते फक्त देशाटन करत आहेत. ‘मी चहा विकला’, हे ते वारंवार सांगतात. पण आम्ही तुम्हाला चहा विकायला सांगितला होता का? तुमच्यामुळे देशातील तरूण आज गरीब झाले आहेत”, अशी टीका त्यांनी केली.
पंतप्रधान मोदींचा फॅशन सेन्स खूप चांगला – दिपके
पंतप्रधान मोदींच्या फॅशन सेन्स आणि स्किन केअरवरही दिपके यांनी भाष्य केले. मोदीजी मोठमोठ्या सेलिब्रिटींनाही स्किन केअरमध्ये मागे टाकू शकतात. तुम्हाला ज्या कारणासाठी निवडून दिले आहे, ते काम करा. मतदार कोण असेल, कोण असणार नाही? हे तुम्ही ठरवू नका. हेच काम जर मागच्या सरकारने केले असते, तर तुम्ही पंतप्रधान झाला नसता, अशी टीका दिपके यांनी केली.
‘महात्मा गांधींना संघाने अधिक त्रास दिला’
आपल्या अधिकारांसाठी लढणे, यापेक्षा महात्मा गांधींना दुसरी मोठी श्रद्धांजली असू शकत नाही, असे सांगताना अभिजीत दिपके यांनी महात्मा गांधींना इंग्रजांपेक्षा संघाने अधिक त्रास दिल्याचे म्हटले. संघाला वाटले होते की, गांधींना गोळी मारून त्यांना संपवता येईल. पण इथे प्रत्येकजण गांधी आहे. गांधी कधी मरत नाहीत. कितीही प्रयत्न करा, गांधी कधीही संपणार नाही.
भारताचे भविष्य उज्ज्वल – विशाल ददलानी
संगीतकार विशाल ददलानी यांनीही शिवाजी पार्कच्या आंदोलनात सहभागी होत ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. “मला या तरुणांमध्ये भारताचे उज्ज्वल भविष्य दिसत आहे. ज्ञानेश कुमार जोपर्यंत जात नाही, तोपर्यंत हे आंदोलन सुरू राहिल”, असे ते म्हणाले.
