Abhijeet Dipke on Delhi vs Maharashtra Police: “दिल्ली आणि महाराष्ट्राच्या पोलिसांमध्ये फार मोठा फरक आहे. महाराष्ट्राच्या पोलीस दलात काम करणारे जवान हे ग्रामीण भागातून येतात. त्यांना परिस्थितीची जाणीव असते. तसेच त्यांच्यावर पुरोगामी विचारांचा पगडा असून ते दिल्ली पोलिसांइतके क्रूर नाहीत. तसेच त्यांना आदेश देणारे गृहमंत्रीही दिल्लीच्या गृहमंत्र्यांसारखे नसून त्यांच्यापेक्षा प्रागतिक विचारांचे आहेत”, अशी भावना अभिजीत दिपकेंनी व्यक्त केली. लोकसत्ताच्या लोकसंवाद मुलाखतीत बोलत असताना अभिजीत दिपके यांनी महाराष्ट्र आणि दिल्ली पोलिसांमधील फरक स्पष्ट करताना हे विधान केले.

निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी कॉक्रोच जनता पार्टीकडून शनिवारी (१० ऑक्टोबर) जंतर-मंतर येथे आंदोलन केले जाणार आहे. त्यापूर्वी शुक्रवारी लोकसत्ताच्या कार्यालयात कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी ‘लोकसत्ता लोकसंवाद’ कार्यक्रमात लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांच्याशी संवाद साधला.

जंतर-मंतरवरील आंदोलनापूर्वी दिल्ली पोलिसांकडून अनेक बंधने टाकण्यात आली आहेत. दिल्लीकडे जाणाऱ्या रेल्वेची तपासणी, दिल्लीतील मेट्रोची सेवा खंडीत केली आहे. तसेच आंदोलनस्थळाच्या परिघातील इंटरनेट सेवा बंद करण्यात येत आहे. सरकारकडून कितीही अडवणूक केली तरी आम्ही आंदोलन करणारच, अशी ठाम भूमिका अभिजीत दिपके यांनी मांडली. तसेच त्यांनी दिल्ली आणि महाराष्ट्राच्या पोलिसांमध्ये सांस्कृतिक फरक असल्याचेही म्हटले.

दिल्ली पोलिसांबद्दल बोलताना दिपके यांनी माजी शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या विरोधात झालेल्या आंदोलनावेळी दिल्ली पोलिसांनी दिलेल्या वागणुकीची माहिती दिली. दिल्ली पोलीस रोबोट सारखे असून ते संवेदनाहीन आहेत. त्यांनी विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण केली. पायावर लाठीचार्ज करण्याचे संकेत असताना त्यांनी मुला-मुलींच्या डोक्यावर वार केले. अतिशय क्रूरपणे विद्यार्थ्यांना झोडपले गेले. केंद्रीय गृहमंत्र्यांनी त्यांना तसे आदेश दिले होते का?, असा आरोप दिपके यांनी केला.

मात्र त्याचवेळी त्यांनी महाराष्ट्र पोलिसांचे कौतुकही केले. २ ऑक्टोबर रोजी शिवाजी पार्क येथे आंदोलन करतेवेळी अभिजीत दिपके यांनी मुंबई पोलिसांचे कौतुक केले होते. याबद्दल लोकसत्ताच्या मुलाखतीत प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, दिल्ली आणि महाराष्ट्राच्या पोलिसांमध्ये सांस्कृतिक फरक आहे. महाराष्ट्राचे पोलीस दिल्ली पोलिसांसारखे क्रूर नाहीत. ते सहृदयी आहेत. त्यांच्यावर शिव-फुले-शाहू-आंबेडकर यांच्या विचारांचा प्रभाव आहे. तसेच त्यांना आदेश देणारे गृहमंत्रीही प्रागतिक विचारांचे आहेत.

अभिजीत दिपके यांनी थेट अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांचे नाव घेतले नसले तरी त्यांनी महाराष्ट्राचे गृहमंत्री सुसंस्कृत असल्याचे म्हटले.

अपवादात्मक घटनांवर टीका

महाराष्ट्र पोलिसांचे कौतुक करत असतानाच आदिवासी विद्यार्थ्यांबरोबर जे घडले त्याचा निषेधही दिपकेंनी नोंदवला. महाराष्ट्र पोलिसांनी दिल्ली पोलिसांची बरोबरी करू नये, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. नाशिकहून मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन करण्यासाठी आलेले आदिवासी विद्यार्थी काँग्रेसच्या टिळक भवनमध्ये थांबले असताना त्यांच्यावर पोलीसी बळाचा वापर करण्यात आला होता.