गेल्या काही दिवसांपासून कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके हे चर्चेत आहेत. कारण अभिजीत दीपके यांच्या नेतृत्वात दिल्लीत झालेल्या आंदोलानंतर अखेर धर्मेंद्र प्रधान यांना शिक्षणमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यामुळे दीपके यांच्याबाबत देशभरात मोठ्या चर्चा सुरू आहेत. भविष्यात अभिजीत दीपके हे राजकारणात उतरणार का? कॉक्रोच जनता पार्टी ही राजकीय पक्ष म्हणून पुढे येणार का? असे अनेक सवाल विचारले जात आहेत.

या सर्व चर्चांवर अभिजीत दीपके यांनी अखेर आज महत्वाचं भाष्य केलं आहे. आपण भविष्यात काही राजकीय स्टँड घेणार का? राजकारणात जाणार का? यावर पहिल्यांदाच अभिजीत दीपके यांनी मोठा खुलासा केला आहे. ‘गरज पडल्यास राजकीय स्टँड घेऊ’, असं सूचक भाष्य अभिजीत दीपके यांनी टीव्ही ९ मराठी या वृत्तवाहिनीच्या मुलाखतीत बोलताना केलं आहे.

अभिजीत दीपके काय म्हणाले?

अण्णा हजारे यांचं दिल्लीत २०११ साली आंदोलन झालं होतं, त्यांच्या आंदोलनानंतर सरकार बदललं. आता भारतात ‘जेन-झी’चं हे पहिलं मोठं आंदोलन आहे. त्यामुळे तुम्हाला वाटतं का की लोकांनी हे सरकार बदलावं? या प्रश्नावर बोलताना दीपके म्हणाले की, “हे लोक ठरवतील. याबाबत मी एकटा व्यक्ती काही सांगू शकत नाही. जर लोकांना वाटलं हे सरकार त्यांचं ऐकत नाही, तर येणाऱ्या निवडणुकीत लोक सरकार बदलून टाकतील. सरकार बदलणं वाईट नाही. एका लोकशाहीसाठी सरकार बदलत राहणं गरजेचं असतं. जेव्हा एक सरकार जास्त काळासाठी सत्तेत राहतं, तेव्हा ते सरकार अंहकारी होतं. माझं म्हणणं असं आहे की सरकार बदलत राहणं लोकशाहीसाठी चांगलं आहे. मला सांगा सरकार का बदललं नाही पाहिजे? कोणत्याही एका पक्षाचं सरकार सत्तेत असणं हे लोकशाहीसाठी चांगलं नाही. नरेंद्र मोदी देखील सरकार बदलल्यामुळेच सत्तेत आलेत”, असं अभिजीत दीपके यांनी म्हटलं आहे.

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाला, यावर तुम्ही खूश आहात का? यावर अभिजीत दीपके म्हणाले की, “धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर आम्ही खूश नाही. पण हा राजीनामा एक सुरूवात होती. सरकारमधील जे नेते म्हणायचे की या सरकारमध्ये राजीनामे होत नाहीत, ते अंहकाराने म्हणायचे. त्या नेत्यांचा तो अंहकार काढणं गरजेचं होतं. ते काम आम्ही केलं. आता तर सुरूवात झालेली आहे, अशा भरपूर गोष्टी आहेत, त्यावर आम्ही हळूहळू काम करू”, असंही दीपके म्हणाले.

राजकारणात जाणार का? दीपके काय म्हणाले?

“आम्ही वेगवेगळ्या मुद्यांवर काम करण्याचा प्रयत्न करत आहोत. मी राजकारणात जाणार, यावर मी कधीही बोललेलो नाही. मी फक्त म्हटलं की आमची फक्त एक पॉलीटिकल मूवमेंट असणार आहे. जे लोकांच्या समस्यांवर काम करेल. राजकीय पार्टी बनवेन असं मी कुठेही बोललो नाही”, असंही दीपके यांनी स्पष्ट केलं.

राजकीय स्टँड घेणार का?

“आमचा स्टँड क्लिअर असेल की जे कोणी सत्तेत बसलेले असतील त्यांनी लोकांना फक्त इग्नोर करू नये. जर त्यांनी तसं केलं तर लोक रस्त्यावर येतील हे नक्की असेल. मग आज मुद्दा शिक्षणाचा होता, उद्या वेगळा मुद्दा असेल. जेव्हा तुम्ही लोकांकडे दुर्लक्ष कराल तेव्हा लोक तुम्हाला धडा शिकवतील. आमचा जो स्टँड असेल तो लोकशाहीच्या बाजूने असेल. लोकशाही आणखी बळकट कशी करता येईल, यासाठी आमचा स्टँड असेल. पण जेव्हा निवडणुका येतील तेव्हा पाहू. तेव्हाचे मुद्दे काय असतील त्यावरून ठरवू. तेव्हा आम्ही राजकीय स्टँड घेऊ. हा पर्याय आमचा खुला असेल. जर तेव्हाही सरकारने काही गोष्टी चुकीच्या केल्या, तर आम्हाला लोकांना सांगावं लागेल की हे सरकार चुकीचं करतंय, या विरोधात बोललं पाहिजे”, असंही अभिजीत दीपके यांनी स्पष्ट केलं.