Mumbai CJP Protest : केंद्रीय निवडणूक आयोगात अंतर्गत मतभेद असल्याची माहिती समोर आल्यानंतर देशभरात मोठी खळबळ उडाली आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधक करत आहेत. या पार्श्वभूमीवर सीजेपीचे संस्थापक अभिजीत दिपके यांच्या नेतृत्वात मुंबईत आंदोलन करण्यात आलं आहे. मुंबईतील शिवाजी पार्क मैदानावर सीजेपीच्यावतीने आज जेलभरो आंदोलन करण्यात आलं असून सरकार आणि निवडणूक आयोगाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे.

या आंदोलनाला राज्यभरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. तसेच या आंदोलनात अनेक कलाकार देखील सहभागी झाले होते. शबाना आझमी, नसीरुद्दीन शाह, विशाल ददलानी यांच्याह आदींनी सीजेपीच्या आंदोलनाला हजेरी लावली. या आंदोलनादरम्यान बोलताना अभिजीत दिपके यांनी पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शाह, निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली आहे. ‘तुमच्या खुर्चीचा एक पाय फेव्हिकॉलचा आहे, तर दुसरा पाय फेव्हिस्टिकने चिकटवलेला आहे’, असं म्हणत अभिजीत दिपके यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मोठा इशाराही दिला आहे.

अभिजीत दिपके काय म्हणाले?

“मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तुम्ही ३ दिवसच जेलमध्ये टाकायचं बोलले. अन्यथा ३ महिने बोलले असते तर संपूर्ण मुंबई बंद पडली असती. तुमची खुर्ची तर आधीच धोक्यात आहे. तुमच्या खुर्चीचा एक पाय फेव्हिकॉलचा आहे, तर दुसरा पाय फेव्हिस्टिकने चिकटवलेला आहे. कधी तो खुर्चीचा पाय पडेल आणि तुमची खुर्ची जाईल हे सांगता येत नाही”, असा इशारा अभिजीत दिपके यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिला.

“मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तुम्हाला आमची एक विनंती आहे की तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहात आणि या महाराष्ट्राला काही वारसा आहे. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज यांचा हा महाराष्ट्र आहे. हे तुम्ही विसारले असाल पण आम्ही विसरलो नाही. या महाराष्ट्रात अशा धमक्या दिल्या जात नाहीत. तुम्ही काय बोलले होते, आंदोलन केलं तर जेलमध्ये जावं लागेल. याचा अर्थ आम्हाला जेलमध्ये टाकायचं होतं का? आम्हा सर्वांना जेलमध्ये टाका. देवेंद्र फडणवीस साहेब फक्त ३ दिवस नाही तर ३ महिने जेलमध्ये टाका. जेलमधून बाहेर आल्यानंतर मी पुन्हा ती घोषणा देईन जी तुम्ही द्यायचे. मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन”, असं म्हणत अभिजीत दिपके यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी काय प्रतिक्रिया दिली?

सीजेपीचे संस्थापक अभिजीत दिपके यांच्या नेतृत्वात आज (२ ऑक्टोबर) मुंबईत आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनाच्या माध्यमातून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली आहे. या आंदोलनाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं की, “मी याआधीही सांगितलं आहे की आता सर्व पर्दाफाश झालेला आहे. यांचा फेक नरेटिव्ह पुढे पसरवण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र, यामध्ये त्यांना कधीही यश मिळणार नाही”, अशा शब्दांत मुख्यमंत्री फडणवीस यांनी टीका केली.