कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके हे मागील काही दिवसांपासून चांगलेच चर्चेत आहेत. कारण त्यांच्या नेतृत्वात दिल्लीत झालेल्या आंदोलनानंतर धर्मेंद्र प्रधान यांना शिक्षणमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला. तसेच कॉक्रोच जनता पार्टीच्या दिल्लीतील आंदोलनाला देशभरातील तरुणांनी मोठा पाठिंबा दिल्याचं पाहायला मिळालं. एवढंच नाही तर अनेक मोठ्या नेत्यांनीही आंदोलनस्थळी भेटी देत दिपकेंच्या आंदोलनाला पाठिंबा दिला होता.

या सर्व घडामोडींनंतर आता अभिजीत दिपके हे भविष्यात राजकारणात उतरणार का? कॉक्रोच जनता पार्टी ही राजकीय पक्ष म्हणून पुढे येणार का? याबाबत अनेक वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत. दरम्यान, अभिजीत दिपके यांना गावाचा सरपंच व्हायचं होतं याबाबतचा एक किस्सा त्यांनी स्वत:च सांगितला आहे. ते एबीपी माझा या वृत्तवाहिनीच्या मुलाखतीत बोलत होते.

अभिजीत दिपके काय म्हणाले?

तुम्हाला गावाचा सरपंच व्हायचं होतं का? तुमचं स्वप्न काय होतं? यावर बोलताना अभिजीत दिपके म्हणाले की, “हो, मला गावाचा सरपंच व्हायचं होतं. माझं मूळ गाव हिंगोली जिल्ह्यातील आहे. तेव्हा मी दरवर्षी उन्हाळ्याच्या सुट्ट्यात माझ्या गावात दोन ते तीन महिने राहायचो. गावाकडे राहायला मला आवडायचं. मला गावाकडची ओढ लहानपणापासून होती. पण मला घरचे शाळेसाठी इकडे छत्रपती संभाजीनगरला आणायचे.”

“पण तिकडे गावाकडे माझे काही मित्र, किंवा माझ्या काकांची मुले तुटलेल्या शाळेत शिक्षण घ्यायचे. गावाकडे लाईट नसायची, पाणी नसायचं, मातीची घरे असायची, आमचंही गावाकडचं घर पावसात गळत असायचं. उन्हाळ्यात गावात पाणी नसायचं, तेव्हा आम्ही बैलगाडीवर एखादा ड्रम मांडून मग लांबून पाणी आणत असायचो. अशी सगळी परिस्थिती मी पाहिलेली आहे. माझ्या वडिलांना चांगलं शिक्षण भेटलं म्हणून मला चांगलं शिक्षण घेता आलं. त्यामुळे गावाकडे जाऊन गावासाठी काही तरी चांगलं काम करावं असं एक छोटसं स्वप्न माझं होतं. तेव्हा मी घरच्यांना बोलायचो की मला गावाचा सरपंच होऊन गावातील शाळा, रस्ते व्यवस्थित करायचे आहेत. गावात एक छोटसं हॉस्पिटल उभं करायचं आहे, म्हणजे गावासाठी काहीतरी चांगलं झालं पाहिजे अशी माझी भावना होती”, असं अभिजीत दिपके यांनी सांगितलं.

गावाचा सरपंच व्हायचं स्वप्न आता सोडून दिलंय का? यावर बोलताना अभिजीत दिपके म्हणाले की,”नाही. उलट आता गावासाठी अधिक चांगल्या प्रकारे काम करता येईल. मात्र, कॉक्रोच जनता पार्टीमुळे आता मला वाटतं की आम्ही देशासाठी चांगलं काहीतरी करू शकतो. पण ते कितीपट यशस्वी होईल हे मी सांगू शकत नाही. पण एवढं नक्की आहे की आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करत राहू.”