Cockroach Janta Party : ‘कॉक्रोच जनता पार्टी’चे संस्थापक अभिजीत दिपके यांच्या नेतृत्वाखाली ६ जून रोजी दिल्लीतील जंतर-मंतरवर आंदोलन करण्यात आलं. त्यानंतर आज (११ जून) पुण्यात आंदोलन करण्यात येत आहे. नीट पेपरफुटी प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी या आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात येत आहे. या आंदोलनात हजारो तरूण सहभाग होत आहेत.

दरम्यान, अभिजीत दिपके यांच्याबाबत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी एक मोठा दावा केला आहे. पंतप्रधान मोदी आणि ‘कॉक्रोच जनता पार्टी’चे संस्थापक अभिजीत दिपके यांची अमेरिकेत भेट झाल्याचा दावा संजय राऊत यांनी केला. त्यांच्या या दाव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आल्याचं पाहायला मिळालं आहे.

तसेच संजय राऊत यांनी या संदर्भात एक फोटो देखील सोशल मीडियावर शेअर केला आहे. दरम्यान, संजय राऊत यांनी केलेल्या दाव्याबाबत आता अभिजीत दिपके यांनी खुलासा केला आहे. ‘संजय राऊत यांचा गैरसमज झाला असावा, पण पंतप्रधान मोदींना मी कधीही भेटलो नाही’, असं अभिजीत दिपके यांनी टीव्ही ९ मराठी या वृत्तवाहिनीशी बोलताना म्हटलं आहे.

अभिजीत दिपके काय म्हणाले?

पंतप्रधान मोदी आणि अभिजीत दिपके यांच्या भेटीबाबत खासदार संजय राऊत यांनी केलेल्या दाव्याबाबत बोलताना अभिजीत दिपके म्हणाले की, “पंतप्रधान मोदी आणि माझी कोणतीही भेट झालेली नाही. माझ्या आणि त्यांच्या भेटीचं कनेक्शन कुठून आलं? मला वाटतं तो फोटो एआय असेल. मी अद्याप तो फोटो पाहिलेला नाही. मात्र, माझी आजपर्यंत पंतप्रधान मोदी यांच्याशी कधीही भेट झालेली नाही”, असा खुलासा अभिजीत दिपके यांनी केला आहे.

‘संजय राऊतांचा गैरसमज झाला असावा…’

“मला वाटतं खासदार संजय राऊत यांचा काहीतरी गैरसमज झाला असावा. पण हे खरं आहे की आजपर्यंत मी पंतप्रधान मोदींना कधीही भेटलेलो नाही. मी खूप छोटा व्यक्ती आहे, मग देशाच्या पंतप्रधानांना कसा भेटणार?”, असं अभिजीत दिपके यांनी म्हटलं आहे.

abhijit dipke clarification sanjay raut

संजय राऊत यांची पोस्ट काय?

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली होती. “अमेरिकेत कोण कोणास भेटले?”, असं कॅप्शन संजय राऊत यांनी त्या पोस्टला दिलं होतं. त्या पोस्टमध्ये एक फोटो त्यांनी शेअर केला होता, तो फोटो अभिजीत दिपके आणि मोदींचा असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला होता. त्यांच्या या पोस्टनंतर आता अभिजीत दिपके यांनी खुलासा केला आहे.

संजय राऊतांनी दुसऱ्या एका पोस्टमध्ये काय म्हटलं?

“कॉक्रोच जनता पार्टी हा भारतीय तरुणांचा संताप आणि चीड आहे, या तरुणांची फसगत होता कामा नये, उलट तो संताप अधिक प्रभावी आणि नियोजित मार्गाने व्यक्त होणं गरजेचं आहे असं माझं मत आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पहिल्याच दिवशी तरुणांचं आंदोलन यशस्वी होण्याबाबत शुभेच्छा दिल्या. तरुणांना न्याय आणि दिशा हवी आहे, या आंदोलनात संघ प्रवृत्ती घुसून त्यांचे “अण्णा” आंदोलन होऊ नये यासाठी कॉक्रोच पार्टीच्या नेत्यांना सतर्क राहावं लागेल! बाकी काय? मोदींना पंतप्रधानपदी बारा वर्षे झाली तो उत्सव डोळे भरून बघत राहूया, जय महाराष्ट्र”, असं संजय राऊत यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

“मोदी रशिया-युक्रेन युद्ध थांबवू शकतात, मग पेपरफुटी का नाही?”, अभिजीत दिपकेंचा सवाल

कॉक्रोच जनता पार्टी’चे संस्थापक अभिजित दिपके यांच्या नेतृत्वाखाली ६ जून रोजी दिल्लीतील जंतर-मंतरवर आंदोलन करण्यात आलं होतं. त्यानंतर झालेल्या एका पत्रकार परिषदेत बोलताना ‘कॉक्रोच जनता पार्टी’चा पुढचा अजेंडा काय असेल? धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी पुन्हा आंदोलन केलं जाईल का? ‘कॉक्रोच जनता पार्टी’ राजकारणात उतरणार का? अशा विविध प्रश्नांवर अभिजीत दिपके यांनी भाष्य केलं होतं.

“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतला पाहिजे. आम्ही ही मागणी आधीपासून करत आहोत. जर पंतप्रधान नरेंद्र मोदी रशिया आणि युक्रेनचं युद्ध थांबवू शकतात, तर पेपरफुटी का थांबवू शकत नाहीत?”, असं अभिजीत दिपके यांनी म्हटलं होतं.

कॉक्रोच जनता पार्टीचा पुढचा अजेंडा काय?

कॉक्रोच जनता पार्टी या पुढे कोणते विषय होती घेणार? पुढचा अजेंडा काय असेल? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला होता. यावर अभिजीत दिपके म्हणाले होते की, “जे-जे युवकांचे मुद्दे असतील, मग शहरी भागातील तरुण असतील किंवा ग्रामिण भागातील, आम्ही प्रत्येकांचे मुद्दे उचलणार आहोत. सध्याचे जे राजकीय पक्ष आहेत किंवा जे सरकार आहे, त्यांच्याकडून आजच्या तरुणांना काहीच अपेक्षा राहिलेल्या नाहीत.”

कॉक्रोच जनता पार्टीचं राजकीय पक्षात रुपांतर होणार?

कॉक्रोच जनता पार्टीचं राजकीय पक्षात रुपांतर करण्यात येणार आहे का? यावर अभिजीत दिपके यांनी म्हटलं होतं की, “मी आताच अमेरिकेतून भारतात आलो आहे. त्यामुळे याबाबत आता बोलणं योग्य नाही. जे आमचे फॉलोअर्स आहेत, त्यांच्याशी आम्ही संवाद साधण्याचा प्रयत्न करू, त्यानंतर आम्हाला त्यांचं म्हणणं आम्ही ऐकू, त्यांच्या समस्या असतील त्या ऐकू आणि त्यानंतर पुढचा निर्णय घेऊ.”