Abhijeet Dipke on Parents Hospitalised : एसआयआर प्रक्रियेतील गैरप्रकार उघड झाल्यानंतर कॉक्रोच जनता पार्टीने मुख्य निवडवणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात आंदोलन पुकारले. आज जंतर मंतर येथे मोठ्या आंदोलनाची हाक देण्यात आली. दरम्यान, आज दिल्लीत जाण्याआधी अभिजीत दिपके काल (९ ऑक्टोबर) रोजी मुंबईत होते. त्यांनी लोकसत्ता लोकसंवाद या कार्यक्रमात सहभागी होत दिल्लीतील दडपशाहीवर भाष्य केलं. तसंच, नीट पेपरफुटी प्रकरणाविरोधात पुकारलेल्या आंदोलनावेळी त्याच्या आयुष्यात वैयक्तिक पातळीवर घडलेल्या एका वाईट प्रसंगाचीही त्यांनी माहिती दिली. हे सांगताना त्यांचा कंठ दाटून आला होता. पण त्यांनी स्वतःला सावरत याबाबत सविस्तर सांगितलं. दरम्यान, दिल्लीत आंदोलन सुरू असतानाच त्यांच्या आजीचं आज निधन झालं.
आई-वडिल दोघेही रुग्णालयात दाखल
तुमच्या आंदोलनावर घरच्यांची काय प्रतिक्रिया आहे? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता. त्यावर अभिजीत दिपके म्हणाले, “मला त्यावर जास्त बोलायचं नाहीय. कारण, मी इमोशनली स्ट्राँग नाही. परंतु, जंतर-मंतर येथील आंदोलनावेळी माझे आई-वडिल दोघेही रुग्णालयात दाखल होते. मी याबाबत कुठेच काहीच बोललो नाही. कारण मला सिम्पथी कार्ड खेळायचं नव्हतं.”
माझ्यापेक्षा जास्त आई-वडिलांनी सहन केलं
ते पुढे म्हणाले, “माझ्या आई-वडिलांना बघायला मला जायचं होतं, पण मी नाही गेलो. जर मी तिथून उठून गेलो असतो तर लोक म्हणाले असते की अभिजीत स्वतः पळून गेला आणि मुलांना मार खायला लावलं. त्यामुळे माझ्यापेक्षा जास्त कोणी सहन केलं असेल तर ते माझ्या आई वडिलांनी केलं आहे.”
प्रत्येक आंदोलनकर्त्या पालकांच्या मनात भीती
“माझ्या आईच्या डोळ्यांत आजही भीती असते. मी घराच्या बाहेर पडतोय, तर मी परत घरी येईन की नाही अशी चिंता सतत तिच्या डोळ्यांत असते. मी बँगलोरसाठी निघत होतो, बँगलोरवरून मी मुंबईला जाईन तिथून दिल्लीला जाईन आणि मग १० तारखेलानंतरच मी घरी येईन, असं मी आईला म्हणालो. पण आई रडत होती. बाबा शांतपणे पाहत होते. मला राग या गोष्टीचा आहे की हे माझ्याबरोबर होत नाहीय, प्रत्येक आंदोलनकर्त्या मुलांच्या आईवडिलांच्या मनात ही भीती आहे. आपला देश आहे, आपले पोलीस आहेत तरीही आई वडिलांना भीती वाटते”, असा सवालही त्यांनी यानिमित्ताने उपस्थित केला.
दरम्यान, आज अभिजीत दिपके यांच्या आजीचे निधन झाले. अभिजीत दिपके हे दिल्ली पोलिसांच्या ताब्यात असल्याने ते अंत्यसंस्कारासाठी गावी पोहोचू शकतील का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
