Abhijit Dipke PM Modi Statement: कॉक्रोच जनता पार्टीची स्थापना करून थेट केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेण्यात यशस्वी ठरलेले अभिजीत दिपके तब्बल ४० दिवसांनी घरी परतले. छत्रपती संभाजीनगरमधील घरी पोहोचल्यानंतर त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळी माध्यमांशी बोलत असताना अभिजीत दिपके यांनी सीजेपीचे आंदोलन, त्यानंतर झालेली पार्टी, खासदार कंगना रणौत यांची टीका, विद्यार्थ्यांवर दाखल झालेल्या गुन्ह्यांबाबत त्यांनी सविस्तर प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदींच्या इन्स्टाग्राम व्हिडीओवरून जोरदार टीका केली.
सीजीपेच्या आंदोलनानंतर विविध राज्यांचे सरकार आंदोलकांचा माग काढून त्यांना त्रास देत आहे. सरकारने हे सोडून दिले पाहिजे. सरकारने आंदोलकांना त्रास देणे सोडले नाही तर येणाऱ्या निवडणुकांमध्ये ते सरकारला धडा शिकवतील. केंद्रीय मंत्र्यांचा राजीनामा घेऊन आंदोलकांचा राग कमी झालेला नाही. हा राग सरकारवर होता. त्यामुळे त्यांनी आंदोलकांचा छळ करणे सोडून द्यावे, असे आवाहन अभिजीत दिपके यांनी केले.
पंतप्रधान मोदी चांगले इन्फ्लुएन्सर
पंतप्रधान मोदी यांनी इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर करण्यास सुरुवात केली आहे. ते व्हिडीओ तुम्ही पाहिलेत का? असाही प्रश्न यावेळी दिपकेंना विचारण्यात आला. यावर अभिजीत दिपके म्हणाले, “मला वाटते पंतप्रधान मोदींनी आता इन्फ्लुएन्सर बनायला हवे. इन्फ्लुएन्सर म्हणून ते चांगले काम करत आहेत. पंतप्रधानांची खुर्ची त्यांनी सोडावी, ते काम दुसरा नेता करेल.”
खासदार कंगना रणौत यांच्या टीकेबाबत बोलताना अभिजीत दिपके म्हणाले की, कंगना रणौत या काही गंभीर राजकीय व्यक्ती नाहीत. त्यामुळे त्यांच्या बोलण्याला आम्ही महत्त्व देत नाहीत.
VIDEO | Chhatrapati Sambhajinagar, Aurangabad: After returning home, CJP founder Abhijeet Dipke says, "After spending the last 36 days at Jantar Mantar, it feels wonderful to finally be back home. After such a long struggle, I will finally be able to sleep peacefully in my own… pic.twitter.com/eaG6vKuuDe
— Press Trust of India (@PTI_News) July 29, 2026
राजीनाम्यानंतरच्या पार्टीवर काय म्हणाले?
धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्यानंतर कॉक्रोच जनता पार्टीने केलेल्या पार्टीवर अनेकांनी आक्षेप घेतला होता. या पार्टीबाबत यावेळी दिपकेंना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले की, ३६ दिवस आमचे स्वयंसेवक रस्त्यांवर दिवस-रात्र बसून होते. त्यांच्यासाठी ती पार्टी होती. भाजपाचे लोक निवडणूक जिंकल्यावर रस्त्यांवर जल्लोष करतात. आम्ही रस्त्यावर न करता तो आतमध्ये केला. स्वयंसेवकांनी एक दिवस एन्जॉय केला असेल तर त्यात वाईट काय? २१ विद्यार्थ्यांच्या आत्महत्येनंतर ज्या प्रकारे धर्मेंद्र प्रधान यांचे संसदेत स्वागत केले गेले, त्यावर भाजपाला लाज वाटली नाही का? असाही प्रश्न अभिजीत दिपके यांनी उपस्थित केला.
अभिजीत दिपकेंचे दोन महिने कसे होते?
अभिजीत दिपके यांनी १६ मे रोजी पहिल्यांदा सरन्यायाधीश सूर्य कांत यांच्या विधानाचा उल्लेख करत सर्व झुरळांनी एकत्र यायला हवे का? अशी पोस्ट एक्सवर शेअर केली होती. त्यानंतर इन्स्टाग्रामवर कॉक्रोच जनता पार्टीच्या नावाने अकाऊंट तयार करण्यात आले. या अकाऊंटला केवळ काही दिवसांत तब्बल दोन कोटीहून अधिक लोकांनी फॉलो केले. दरम्यान १२ मे रोजी नीटचा पेपर फुटल्याची बातमी बाहेर आली. ज्यामुळे देशभरात विविध ठिकाणी २१ विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली.
विद्यार्थ्यांच्या आत्महत्या झाल्यानंतर कॉक्रोच जनता पार्टीने केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली. अभिजीत दिपके ६ जून रोजी अमेरिकेतून भारतात परतले. त्यानंतर देशभरातील महत्त्वाच्या शहरात मोर्चे काढून आंदोलनाची तयारी केली. त्यानंतर जंतर-मंतर येथे बेमुदत आंदोलन सुरू करण्यात आले. अखेर २५ जुलै रोजी या आंदोलनाला यश मिळाले.
