CJP ने म्हणजेच कॉक्रोच जनता पार्टीने जे आंदोलन केलं, त्या आंदोलनाला यश मिळालं. कारण धर्मेंद्र प्रधान यांना २५ जुलैला राजीनामा द्यावा लागला. २० जुलैला या विद्यार्थ्यांच्या संसद मार्चवर लाठीचार्ज करण्यात आला. त्यानंतर देशभरातून या आंदोलनाला प्रचंड पाठिंबा मिळाला आणि हे आंदोलन यशस्वी होऊ शकलं. या आंदोलनाचं श्रेय मी सोनम वांगचुक यांना देईन असं अभिजीत दिपकेंनी म्हटलं आहे.एवढंच नाही तर २० जुलैला लाठीचार्जनंतर काय परिस्थिती होती ते देखील अभिजीत दिपकेंनी सांगितलं आहे.

२० जुलैला काय घडलं?

२० ते २५ जुलै हे पाच दिवस आमच्यासाठी कठीण काळ होता. खास करुन २० जुलैला लाठीचार्ज करण्यास सुरुवात झाली तो दिवस मला विसरता येणार नाही. पुरुष पोलीस अधिकाऱ्यांनी मुलींवर लाठ्या चालवल्या. भावनिकदृष्ट्या तो प्रसंग खूपच भावूक करणारा होता. आमच्यावर लाठ्या चालवल्या जातील, पॅलेट गनमधून गोळीबार केला जाईल हे मला वाटलंही नव्हतं. राजकीय पक्षांचे लोक आंदोलन करतात तेव्हा तुम्ही वॉटर कॅनन वापरता. मग विद्यार्थी आंदोलनावर लाठीचार्ज का केला? तसंच पॅलेट गनचा वापर का केला? विद्यार्थी काय दहशतवादी होते का?

तोडलेली व्हॅन आणून ठेवण्यात आली होती-दिपके

अभिजीत दिपके म्हणाले की, “मी आंदोलनासाठी बसलो होतो त्यावेळेपासून रोज सांगायचो की, बाहेरून काही लोक येतील आणि ते आंदोलनाला बदनाम करतील. नेमकं तेच झालं. आंदोलनात बाहेरचे लोक आले. १९ जुलैच्या रात्री दगडाने भरलेला ट्रक आला होता. २० जुलै रोजी पहाटे पाच वाजता मी त्याचा व्हिडीओ शेअर केला. त्या ठिकाणी एक मोडलेली व्हॅन त्या ठिकाणी होती. आम्ही महिनाभर आंदोलन केलं, मात्र काहीही झालं नाही. पण २० जुलै रोजी आम्ही संसदेवर मोर्चा काढणार होतो, त्यावेळीच हे कसं झालं?” असा प्रश्न अभिजीत दिपकेंनी विचारला. माझा कट्टा या एबीपी माझाच्या कार्यक्रमात अभिजीत दिपकेंनी हे विधान केलं आहे.

विद्यार्थ्यांना मारा असे आदेश पोलिसांना होते

अभिजीत दिपके म्हणाले असे आदेश होते की, “विद्यार्थ्यांना इतकं मारा की यापुढे त्यांची कोणतंही आंदोलन करण्यासाठी हिंमत झाली नसली पाहिजे, असे आदेश दिल्ली पोलिसांना दिले होते. त्यातून एका १२ वर्षांच्या मुलीला मारलं. एका पोलीस अधिकाऱ्याने १७ वर्षांच्या मुलीचा गळा आवळल्याचं मी पाहिले. त्यातून विद्यार्थ्यांना एक संदेश द्यायचा होता. त्यावेळी सगळे विद्यार्थी चिडले आणि कोणत्याही परिस्थितीत संसदेकडे जायचं त्यांनी ठरवलं. पण लाठीचार्ज झाल्यानंतर मी संसदेकडे जायचं नाही असं सांगितलं. त्यावेळी सगळे विद्यार्थी माझ्यावर चिडले. कुणाचाही जीव जायला नको असा उद्देश त्यामागे होता.”

मी अर्धा तास रडत बसलो होतो-अभिजीत दिपकेे

अभिजीत दिपके पुढे म्हणाले की, “त्यावेळी अनेकजण मला सोडून गेले. त्यावेळी सगळं आंदोलन संपलं असंच वाटलं. त्यावेळी सगळी आशा संपली असंच मला वाटलं, सगळी मेहनत वाया गेल्याचं मला वाटलं. त्यावेळी फुटपाथवर अर्धा तास मी रडत बसलो होतो. त्यावेळी काहीजण सोबत आले आणि पुढे काय करायचं हे त्यांनी विचारलं. हळूहळू गर्दी वाढत गेली. मी आता इथून उठणार नाही, असंच मी ठरवलं. त्याचवेळी सोबत असलेले सगळे तिथेच बसले. हे सगळं पाहिल्यानंतर मला धीर आला. आता या ठिकाणाहून हलायचं नाही असं मी ठरवलं. लोक आपल्यासोबत आहेत, याची जाणीव झाली.” असं अभिजीत दिपकेंनी सांगितलं.