scorecardresearch

निवडणूक आयोगाविरोधात उद्धव ठाकरे आक्रमक, निकाल मान्य नाही म्हणत केली मोठी मागणी

निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर उद्धव ठाकरे आक्रमक झाले आहेत.

uddhav thackeray (3)
फोटो- लोकसत्ता ग्राफिक्स टीम

निवडणूक आयोगाने ‘शिवसेना’ नाव आणि ‘धनुष्यबाण’ पक्षचिन्ह एकनाथ शिंदे गटाला बहाल केलं आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयानंतर उद्धव ठाकरे आक्रमक झाले आहेत. निवडणूक आयोगाचा निकाल एकांगी असून आपण तो मानायला तयार नाही, असं विधान उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. शिवाय निवडणूक आयोग बरखास्त करा, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

निवडणूक आयोगाच्या निकालावर भाष्य करताना उद्धव ठाकरे म्हणाले, “जेव्हा या वादाला सुरुवात झाली, तेव्हा निवडणूक आयोगानं आम्हाला प्रतिज्ञापत्रं सादर करायला लावली होती. सदस्य संख्या दाखवा, असं सांगितलं होतं. मग मधल्या काळात चार-सहा महिने गेले. दरम्यान, शिवसेनेनं बोगस प्रतिज्ञापत्रं दिली अशा बातम्या आल्या. यानंतर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ठिकठिकाणी जाऊन शपथपत्रे तपासली. त्यामध्ये असत्य असं काहीच नाही, सर्व कागदपत्रे योग्य आहेत, असा अहवाल गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दिला.”

“निवडणूक आयोगानं सांगितलेल्या फॉरमॅटनुसार आम्ही शपथपत्रे दाखल केली. पाऊस पडत असताना आम्ही सुरक्षित पद्धतीने सर्व प्रतिज्ञापत्रे आयोगाकडे नेऊन दिली. आमच्याकडे रद्दी वाढली होती, म्हणून आम्ही ही कागदपत्रे निवडणूक आयोगाकडे दिली नव्हती. निवडणूक आयोगानेच आम्हाला सांगितलं होतं की, तुम्हाला तुमच्या पदाधिकाऱ्यांची प्रतिज्ञापत्र सादर करावी लागतील. तसेच सदस्य संख्या दाखवावी लागेल. त्यानुसार आम्ही सर्व कागदपत्रं जमा केली,” असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

हेही वाचा- “…तर २०२४ ची निवडणूक शेवटची असेल”, जिल्हाप्रमुखांच्या बैठकीनंतर उद्धव ठाकरेंचं मोठं विधान!

उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, आम्ही लाखोंनी उपद्व्याप केल्यानंतर अचानक निवडणूक आयोग असं म्हणायला लागलं की, प्रतिज्ञापत्रं चालणार नाहीत. तुमच्या पक्षाकडून निवडून आलेल्या सदस्यांच्या बहुमतानुसार पक्ष कुणाचा हे ठरवलं जाईल. पण संबंधित आमदार पात्र आहेत की अपात्र आहेत, याचा निर्णय आधी व्हायला पाहिजे. जर तुम्हाला हाच निकष लावायचा होता, तर आम्हाला एवढी मेहनत का करायला लावली? आमच्या शिवसैनिकांना पदरमोड का करायला लावली? तुम्ही १०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञापत्रं लिहून का घेतली? असे सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केले.

हेही वाचा- …तर खुद्द उद्धव ठाकरेंनाही शिंदे गटाचा व्हीप लागू होणार? निवडणूक आयोगाच्या निकालामुळे ठाकरे गटासमोर पेच!

“हा सगळा घटनाक्रम बघितल्यानंतर आताचा निवडणूक आयोग बरखास्त झाला पाहिजे आणि निवडणुकीच्या प्रक्रियेनं निवडणूक आयुक्त नेमले पाहिजे, ही शिवसेनेची मागणी आहे. कारण हा निकाल मानायला मी तयार नाही. हा सरळ सरळ अन्याय आहे. काल-परवा अमित शाह महाराष्ट्रात येऊन गेले. त्यांनी एकनाथ शिंदेशी केलेल्या युतीला भाजपा-शिवसेना युती म्हटलं, पण ती युती ही नाहीये. ते चोरलेलं धनुष्यबाण आहे. हे शिवधनुष्य आहे, ते रावणाला पेललं नव्हतं. ते मिध्यांना कसं काय पेलणार?” असा खोचक सवालही उद्धव ठाकरेंनी विचारला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 20-02-2023 at 15:34 IST
ताज्या बातम्या