पांढऱ्या जांभळातून भरघोस उत्पन्न!; पहिलाच प्रयोग इंदापुरात यशस्वी

पांढऱ्या रंगाच्या जांभळाचे पीक इंदापूर तालुक्यातील भारत वामन लाळगे या शेतकऱ्याने घेतले आणि ते यंदा यशस्वी करून दाखवले आहे.

एजाजहुसेन मुजावर

सोलापूर : पांढऱ्या रंगाच्या जांभळाचे पीक इंदापूर तालुक्यातील भारत वामन लाळगे या शेतकऱ्याने घेतले आणि ते यंदा यशस्वी करून दाखवले आहे. या अनोख्या जांभळाला नुकताच पहिला बहर आला असून  बाजारात या जांभळाने प्रतिकिलो तीनशे ते चारशे रुपयांपर्यंत भावही खाल्ला आहे. लाळगे कुटुंबीयांसाठी पुढील १५ वर्षे पांढऱ्या जांभळाची शेती आर्थिकदृष्टय़ा शाश्वत ठरण्याची अपेक्षा आहे. इंदापूर तालुक्यातील सरडेवाडी व सराफवाडी येथे लाळगे कुटुंबीयांची साडेतेवीस एकर शेती आहे.  नवीन पिकाचा शोध घेत असताना पांढऱ्या रंगाच्या जांभळाची माहिती मिळाल्यानंतर ते चकित झाले. ओडिशामध्ये पांढऱ्या जांभळाची रोपे मिळतात हे समजल्यानंतर त्याचा अभ्यास करून त्यांनी २०१९ साली या प्रजातीची ३०२ रोपे मागविली. शेतात आंतरपीक म्हणून एक एकर क्षेत्रात त्यांनी या पांढऱ्या जांभळाची रोपे लावली.

ठिंबक सिंचनावर आणि दोन रोपांमध्ये ठरावीक अंतर ठेवून आणि योग्य निगा राखत ही रोपे वाढविली. तीन वर्षांनंतर म्हणजे गेल्या एप्रिल महिन्यात झाडांना प्रथमच बहर आला.  तयार जांभळे नुकतीच  पुण्याच्या गुलटेकडी बाजारात पाठवण्यात आली. प्रतिकिलो तीनशे ते चारशे रुपयांपर्यंत या जांभळांना भाव मिळाल्याने लाळगे कुटुंबीयदेखील हरखून गेले आहे. पांढऱ्या रंगाच्या जांभळाचे महत्त्व- आंबट, तुरट, मधुर, रसाळ आणि गरदार अशा या फळामध्ये औषधी गुणधर्म आहेत. विशेषत: मधुमेहींसाठी हे जांभूळ विशेष गुणकारी मानले जाते.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Abundant income white jamun first experiment successful indapur successfully demonstrated ysh

Next Story
राणा दाम्पत्याचे नागपुरात ‘हनुमान चालीसा’ पठण
फोटो गॅलरी