अलिबाग – अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी, आरोपी शिक्षकाला आजन्म कारावासाची शिक्षा माणगाव सत्र न्यायालयाने सुनावली. नित्यानंद पाटील असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.   सदर घटना  १७ जुलै २०१९ च्या दरम्यान रायगड जिल्हा परिषदेच्या फलाणी येथील शाळेत घडली होती. आरोपी शिक्षक म्हणून कार्यरत होता. शाळेतील दोन मुलींवर त्याने वेळोवेळी लैंगिक अत्याचार आणि अनैसर्गिक अत्याचार केले. याप्रकरणी पीडित मुलींच्या तक्रारी नंतर गोरेगाव पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात बलात्कार आणि पॉस्को कायद्यातील विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

   पोलिसांनी तपास करून आरोपी विरोधात माणगाव सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. या प्रकरणाची सुनावणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश पी पी बनकर यांच्या न्यायालयासमोर झाली. या प्रकरणात अ‍ॅड जितेंद्र म्हात्रे यांनी सरकारी अभियोक्ता म्हणून काम पाहिले. सुनावणी दरम्यान पीडित मुली, त्यांची आई, शाळेवरील सह शिक्षिका, वैद्यकीय अधिकारी आणि तपास अधिकारी यांच्या साक्षी महत्त्वपूर्ण ठरल्या. दोन्ही बाजूचे युक्तिवाद ऐकून घेतल्यावर न्यायालयाने आरोपीला भादंवि कलम ३७६, ३७७ पॉस्को कायद्यातील कलम ४,६,८ अन्वये दोषी ठरविले आणि आरोपीला आजन्म कारावास आणि दीड लाख रुपयांचा दंडही ठोठावला.