scorecardresearch

कौटुंबिक हिंसाचार कायद्याच्या गैरवापरामुळे कुटुंबव्यवस्था धोक्यात – रामतीर्थकर

कौटुंबिक हिंसाचार कायद्याचा गैरवापर सुरु झाल्याने कुटुंब व्यवस्था आज अडचणीत आली आहे

(संग्रहित छायाचित्र)

 

न्यायालयात तीन लाख ४० हजार घटस्फोटाचे खटले पडून आहेत. नात्यातील जिव्हाळा व प्रेम कमी होत आहे. अहंकारामुळे हे सारे घडत आहे. कौटुंबिक हिंसाचार कायद्याचा गैरवापर सुरु झाल्याने कुटुंब व्यवस्था आज अडचणीत आली आहे. अशी खंत सामाजिक कार्यकर्त्यां अपर्णा रामतीर्थकर यांनी व्यक्त केली.

डाकले महाविद्यालयातील १९८२ — १९८३ च्या माजी विद्यार्थ्यांच्या स्नेहमेळाव्यात त्या बोलत होत्या. यावेळी सामाजिक कार्यकर्ते सत्यनारायण उपाध्ये यांनी रामतीर्थकर यांच्या संस्थेस साडय़ा तसेच कपडे भेट दिले. तर प्रशांत गिरमे यांनी आर्थिक मदत केली. चेन्नई येथील लक्ष्मी मुदलीयार यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.

रामतीर्थकर पुढे म्हणाल्या, कुंटुब व्यवस्था अडचणीतून वाटचाल करत आहे. दुख: सांगायला कुणी नाही. रडायला वेळ नाही. म्हाताऱ्या आई वडिलांना जेवू घालायला मुले तयार नाहीत. सावित्रीबाई फुलेंनी मुलींना शिकविली. पण आज अनेक मुलीत न्रमता व संवेदना दिसत नाही. उच्चविद्यविभूषित मुलीमध्ये घटस्फोट मागण्याचे प्रमाण जास्त आहे. न्यायालयात त्याकरिता खटले चालले की मुलांची होरपळ होते. देवकीचा कान्हा हा यशोदेच्या पदरात वाढतो व जगतो. आज अनेक मुलांना निराधार गृहात जाण्याची वेळ आली. अहंकार हेच त्याचे मुळ आहे. आम्ही घटस्फोटापासून दोन हजार जणांना प्ररावृत केले. आज ते सुखाने नांदत आहे. ऐकमेंकाचा सन्मान केला. आत्मपरीक्षण केले की भांडणे मिटतात. पण मुलींचे संसार महिलाच अधिक मोडतात. मुलीच्या आईने तिच्या संसारात हस्तक्षेप करु नयेत. तिला जबाबदारीचे व नात्याचे भान द्यावे. प्रेम, जिव्हाळा शिकवावा, संकटावर मात करण्याचे धैर्य निर्माण करावे. सून घरात आल्यावर सासूनेही लक्ष कमी करावे. आजच्या जीवनशैलीत पतीपत्नीला मोकळीक हवी असते ती उपल्बध करुन द्यावी. तरच नात्याला न्याय देता येईल. असे त्या म्हणाल्या.

निसर्गाने स्त्रीत्वाच्या पाच गोष्टी या महिलांना दिल्या आहेत. मातृत्वाचा अनुभव, कोमलता, खंबीरपणा, त्याग, पावित्र्य, क्षमाशीलता, नाजुकपणा पुरुषांकडे नसतो. तो महिलांकडे असतो. पुरुष एकटा राहू शकत नाही. शेतकरी आत्महत्या करतो. हे प्रमाण वाढले आहे. पण नंतरचा संसार त्याची पत्नी चालविते. पुन्हा कुंटुब उभे करते. मुलींचे करियर जरुर आहे. पण यशाच्या शिखरावर गेल्यानंतर स्वदेश व स्वधर्माला विसरता कामा नये. अहंकार सोडला की सर्व प्रश्न सुटतील.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Abuse of family violence law threatens the family system aparna ramtirthakar abn

ताज्या बातम्या