पसरणी (पाचगणी) घाटात दोन एसटी बस एक दुसऱ्यावर आदळून झालेल्या अपघातात पंधरा प्रवासी जखमी झाले. त्यातील दोघांची प्रकृती गंभीर आहे. त्यांना सातारा येथील जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे.
रविवारी सकाळी अकरा-आडेअकराच्या सुमारास वाई-महाबळेश्वर जनता शटल बस पसरणी (पाचगणी) घाटातून महाबळेश्वरकडे जात असताना दत्तमंदिराजवळील अवघड वळणावर पाचगणीकडून आलेल्या दुचाकीस्वाराने हुलकावणी दिली. दुचाकीस्वाराला वाचविण्याच्या प्रयत्नात असताना एसटी चालकाने ब्रेक लावल्याने वाई-महाबळेश्वर गाडी अचानक थांबली. पाचगणी घाट  चढत असलेली पाठीमागून आलेली वाई-महाड मुंबई ही एसटी बस त्यावर आदळून गाडीतील पंधरा प्रवासी जखमी झाले. यात चालकाचाही समावेश आहे. त्यातील दोघांची प्रकृती गंभीर आहे. त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींना वाई आगाराने पाचशे रुपये तातडीची मदत व आरोग्य सेवा उपलब्ध करून दिली. नंतर काही जखमी प्रवाशांना घरी सोडण्यात आले. आगार प्रमुख वामन जाधव, सहायक शिरीष जाधव व श्री. गायकवाड यानी परिश्रम करून सर्व रुग्णांना मदत पोहोचविली.