नगरहून ओरंगाबादकडे निघालेल्या एका पोलिसांच्या व्हॅनला नेवासा येथे मोठा अपघात झाला असून यामध्ये अकरा पोलीस जखमी झाले आहेत. जखमींना नेवाशाच्या शासकीय रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. मंगळवारी सकाळच्या सुमारास ही घटना घडली.

सुत्रांच्या माहितीनुसार, शहरातील बिघडलेली कायदा व सुव्यवस्था लक्षात घेऊन पोलीस दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नगरमध्ये धाव घेतली होती. तसेच जिल्ह्य़ातील पोलिसांसह नाशिक आणि औरंगाबाद येथून पोलिसांची अतिरिक्त कुमुक मागवण्यात आली होती. दरम्यान, सध्या नगरमधील परिस्थिती निवळल्यानंतर पोलिसांची ही तुकडी आपल्या जिल्ह्यात परतत असतानाच मंगळवारी सकाळी त्यांची व्हॅन एका कंटेनरला धडकली. या धडकेत पोलिस व्हॅनमधून प्रवास करणाऱ्या २५ पोलीस कर्मचाऱ्यांपैकी ११ पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. जखमींपैकी एका पोलिसाच्या हाताला गंभीर दुखापत झाली असून त्याचा हात मोडल्याचे कळते. तर इतर दहा पोलिस किरकोळ जखमी झाले आहेत. त्यांच्यावर नेवाशाच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

शनिवारी अहमदनगरमधल्या केडगाव प्रभाग क्रमांक ३२ मधल्या पोटनिवडणुकीदरम्यान शिवसेनेचे उपशहर प्रमुख संजय कोतकर आणि कार्यकर्ते वसंत ठुबे यांच्यावर शनिवारी सुवर्णनगर परिसरात गोळीबार करुन गुप्तीने वार करून ठार मारण्यात आले. या हत्याकांडानंतर जमावाने दगडफेक करुन वाहनांची मोडतोड केली. त्यामुळे केडगावात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. यादरम्यान शिवसेनेकडून रविवारी नगर जिल्हा बंदची हाकही देण्यात आली होती. त्यामुळे शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी जिल्हा पोलीस मुख्यालयाने इतर जिल्ह्यांतून पोलिसांची जादा कुमक मागवली होती.