scorecardresearch

चंद्रपूरमध्ये पेट्रोल टँकर आणि ट्रकचा भीषण अपघात, दुर्घटनेनंतर उडालेल्या आगीच्या भडक्यात ९ जण होरपळले!

चंद्रपूर-मूल महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात ९ जणांचा मृत्यू झाला आहे.

chandrapur mul highway accident
चंद्रपूर-मूल महामार्गावर भीषण अपघात!

चंद्रपूर-मूल मार्गावरच्या अजयपूर येथे अपघातात नऊ जणांचा आगीत होरपळून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अजयपूर गावाजवळ गुरुवारी मध्यरात्री रात्री २ ट्रकमध्ये भीषण अपघात झाला. डिझेल वाहतूक करणारा टँकर आणि लाकूड नेणाऱ्या ट्रकमध्ये समोरासमोर धडक झाली. अपघातानंतर टँकरमधील डिझेलमुळे भीषण आगीचा भडका उडालाय. ट्रकचे टायर फुटल्याने आग अधिकच पसरली. मूल-चंद्रपूर अग्निशमन पथकाने मोठ्या प्रयत्नांनंतर ही आग विझवली. या आगीत मृत पावलेल्या प्रवाशांचे मृतदेह जळून खाक झाले.

नेमकं झालं काय?

गुरुवार १९ मे ला रात्री १०.३० वाजताच्या सुमारास वडसा वरून चंद्रपूर ला लाकूड घेऊन येणाऱ्या ट्रक क्रमांक एमएच ३१ सीक्यू २७७० आणि चंद्रपूरवरून मूलकडे जाणारा डीझल टँकर क्रमांक एमएच ४० बीजी ४०६० या दोन वाहनांची समोरासमोर जोरदार धडक झाल्याने ट्रक ला आग लागली. आगीने बघता बघता भीषण रूप धारण केल्याने संपूर्ण ट्रक व त्यामध्ये असलेले ९ जण जळून खाक झाले.

लाकूड भरलेल्या ट्रक मध्ये वाहनचालक ३० वर्षीय अजय सुधाकर डोंगरे (रा. बल्लारपूर), ३३ वर्षीय प्रशांत मनोहर नगराळे, ३० वर्षीय मंगेश प्रल्हाद टिपले, २५ वर्षीय महिपाल परचाके, ४६ वर्षीय बाळकृष्ण तुकाराम तेलंग, ४० वर्षीय साईनाथ बापूजी कोडापे राहणार नवी देहली, २२ वर्षीय संदीप रवींद्र आत्राम रा. तोहोगाव कोठारी हे सर्व मजूर लाकूड उतरविण्यासाठी चंद्रपूरला येत होते.

तर डीझेल टँकर मधील वाहनचालक ३५ वर्षीय हनिफ खान रा. अमरावती, कंडक्टर ३५ वर्षीय अजय पाटील वर्धा हे दोघेही ट्रकला लागलेल्या आगीत होरपळून मृत पावले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Accident on chandrapur mul highway tanker truck collided 9 died pmw