राज्यात दोन वेगवेगळ्या अपघातात ९ जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. मंगळवारी पहाटे सोलापूर- तुळजापूर मार्गावर रस्त्यावर एका कारला भरधाव प्रवासी जीपने धडक दिल्याने पाच जणांचा मृत्यू झाला. तर मलकापूर – बुलढाणा मार्गावारही टेम्पोने रस्त्यालगत थांबलेल्या चार जणांना चिरडले.

सोलापूर – तुळजापूर मार्गावर हॉटेलजवळ एक कार थांबली होती. कारचा टायर पंक्चर झाला होता. याच दरम्यान तिथून एक प्रवासी जीप जात होती. रानडुकराला चुकवण्याच्या नादात चालकाचे जीपवरील नियंत्रण सुटले आणि जीपने रस्त्यालगत थांबलेल्या कारला धडक दिली. या अपघातात पाच जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर सात जण जखमी झाले आहे. मृतांमध्ये एक जण सोलापूरचा असून चौघे कर्नाटकमधील रहिवासी आहे.यातील एक जण पोलीस शिपाई असल्याचे समजते. जखमींवर सोलापूरमधील सिव्हिल रुग्णालयात उपचार सुरु आहेत. अपघातात मृत्यू झालेले सर्व जण औरंगाबादमधील इज्तेमावरुन परतत असताना त्यांच्यावर काळाने घाला घातला.

सोलापूरमधील घटनेपूर्वी सोमवारी रात्री उशिरा मलकापूर – बुलढाणा रस्त्यावर एका टेम्पोने रिक्षेला धडक दिल्याची घटना घडली. याच टेम्पोने पुढे जाऊन मोताळा येथे रस्त्याच्या कडेला थांबलेल्या चार जणांना चिरडले.