भारत-बांगलादेश सद्भावना सायकल यात्रेदरम्यान ओरिसात दुर्घटना

नगर : भारत-बांगलादेश सायकल सद्भावना यात्रेचे समन्वयक व स्नेहालय संस्थेच्या  ‘युवा निर्माण’ प्रकल्पाचे समन्वयक विशाल ताराचंद अहिरे (२६, श्रीरामपूर, सध्या रा. प्रोफेसर कॉलनी चौक, नगर) यांचा ओरिसा राज्यातील अपघातात मृत्यू झाला. त्यांच्यासमवेत असलेले सद्भावना यात्रेतील अन्य तिघे जखमी झाले. अपघात काल, रविवारी पहाटे ओरिसातील पल्लाहाळ जिल्ह्यात अंगोली गावाजवळ झाला.

संतोष धर्माधिकारी, अजय वाबळे व योगेश गवळी (तिघेही रा. नगर) अशी जखमींची नावे आहेत. यातील जखमी संतोष धर्माधिकारी व अजय वाबळे या दोघांना कटक (ओरिसा) रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे तर योगेश गवळी नगरकडे रवाना झाले आहेत. विशाल अहिरे यांचे पार्थिव रुग्णवाहिकेतून घेऊन सद्भावना यात्रेतील कार्यकर्ते नगरकडे रवाना झाले आहेत. अहिरे यांच्या पार्थिवावर श्रीरामपूरमध्ये मंगळवारी पहाटे अंत्यविधी होणार असल्याची माहिती त्यांच्या समवेत असलेले ‘स्नेहालय’चे संस्थापक गिरीश कुलकर्णी यांनी सांगितले.

स्वातंत्र्याच्या ७५ व्या महोत्सवाचे औचित्य साधत म. गांधी जयंती दिनी, दि. २ ऑक्टोबरला स्नेहालय परिवारातील सुमारे १५० कार्यकत्यांनी भारत-बांगलादेश सायकल सद्भावना यात्रेचे आयोजन केले होते. त्यातील ८३ सायकलस्वार सीमा ओलांडून बांगलादेशमध्ये गेले तर उर्वरित सीमेवरून परतले. बांगलादेशमध्ये पोचलेले सायकलस्वार दि. २७ नोव्हेंबरला परत निघाले होते. परतताना सायकलस्वरांचे तीन गट तयार करण्यात आले होते. यात्रेसमवेत असलेल्या रुग्णवाहिकेतून विशाल अहिरे, संतोष धर्माधिकारी, अजय वाबळे, योगेश जाधव परतत होते. भुवनेश्वरजवळ रस्त्यात उभ्या असलेल्या एका ट्रकला अ‍ॅम्ब्युलन्सची धडक बसली. त्यात विशाल अहिरे यांचा जागीच मृत्यू झाला तर इतर तिघे जखमी झाले. दाट धुक्यामुळे अपघात झाल्याचे कुलकर्णी यांनी सांगितले.

चौघेही कार्यकर्ते स्नेहालय परिवारात अनेक वर्षांपासून काम करत आहेत. त्यांच्यावर विविध प्रकल्पांच्या जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या होत्या. विशाल अहिरे मूळचा श्रीरामपूरचा. परंतु बालपणीच स्नेहालयमध्ये दाखल झाला व शिक्षण पूर्ण करून तो स्नेहालयमध्ये स्वयंसेवकाची भूमिका बजावत होता. नंतर त्याच्याकडे ‘युवा निर्माण’ प्रकल्पाचे समन्वयकपद सोपवण्यात आले होते. सद्भावना यात्रेच्या नियोजनात त्याचा प्रमुख सहभाग होता.