सोलापूर : तिरूपती बालाजी दर्शनासाठी गेलेल्या सोलापुरातील भाविकांच्या वाहनाला तिरूपतीजवळ अपघात होऊन त्यात पाच तरूणांचा मृत्यू झाला. तर अन्य चारजण गंभीर जखमी झाले. सर्व मृतदेह गुरूवारी सायंकाळी आंध्र प्रदेशातून सोलापुरात आणण्यात आले. नंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान, या दुर्घटनेबद्दल सहवेदना व्यक्त करीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व पाच मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख रूपयांची मदत जाहीर केली आहे. तसेच जखमी झालेल्या चारजणांवरील वैद्यकीय उपचार शासकीय खर्चाने उपलब्ध करण्याचेही जाहीर केले.
अजय नागनाथ लुत्ते (वय ३०), मयूर दयानंद मठपती (वय २७, रा. जानकी नगर, जुळे सोलापूर), ऋषिकेश मधुसूदन जंगम-हिरेमठ (वय २७, रा. कुमठेकर हाॕस्पिटलजवळ, जुळे सोलापूर), अथर्व अनंत टेंभुर्णीकर (वय १९)आणि अंबादास कुमार (रा. सोलापूर) अशी मृतांची नावे आहेत. तर वामोटारचालक राहुल रोहिंटन इराणी, राहुल ईराणी, सुधन्वा श्रीकृष्णा आणि यश जगदीश पाटील यांचा जखमींमध्ये समावेश आहे. त्यांच्यावर तिरूपती देवस्थानच्या रूग्णालयात उपचार सुरू आहेत. या दुर्घटनेची माहिती समजताच आंध्र प्रदेशाचे माजी राज्यपाल राहिलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी आंध्र पोलीस प्रशासनाशी संपर्क साधून मदतकार्य करण्यास सांगितले.
दरम्यान, या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या पाच तरूण भाविकांच्या कुटुंबीयांप्रती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहवेदना व्यक्त केल्या. मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख रूपयांची मुख्यमंत्री सहायता निधीतू मदत देण्याचेही जाहीर केले.या दुर्घटनेतील जखमी राहील इराणी याच्या वाढदिवचे औचित्य साधून त्याच्यासह नऊजण तिरूपती बालाजीच्या दर्शनासाठी गेले होते. बालाजी दर्शनानंतर अन्य देवदर्शनासाठी सुवर्ण मंदिराकडे जात असताना तिरूपतीपासून अवघ्या १६ किलोमीटर अंतरावर, चंद्रगिरी येथे त्यांची तवेरा मोटार रस्त्याच्या दुभाजकावर जोरात आदळली आणि हा भीषण अपघात झाला. राहुल इराणी हा स्वतः मोटार चालवत होता. त्याच्या विरूध्द चंद्रगिरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.