राहाता : पोलीस कोठडीत असलेल्या आरोपीला आज मंगळवारी येथील न्यायालयात हजर करण्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाचे कर्मचारी घेऊन जात असताना या आरोपीने लघुशंकेचा बहाणा करीत समोरून चाललेल्या अवजड वाहतूक ट्रेलरच्या मागील चाकाखाली उडी घेतल्याने त्याचा जागीच चिरडून मृत्यू झाला. ही घटना आज मंगळवारी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास नगर-मनमाड रस्त्यावरील बाभळेश्वार चौकात घडली. या झालेल्या अचानक घटनेमुळे खळबळ उडाली आहे.

जनार्दन चंद्रय्या बंडीवार (वय ४६, राहणार राहाता) असे मृत आरोपीचे नाव आहे. आरोपी जनार्दन चंद्रय्या बंडीवार याचे शहरात ताडी विक्रीचे दुकान असून तो बनावट ताडी बनवून विक्री करीत असल्याच्या आरोपावरून राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या बाभळेश्वार येथील पथकाने त्याच्यावर कारवाई करून त्यास अटक केली होती. त्यास न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली होती. त्याची मुदत आज मंगळवारी संपत असल्याने मयत आरोपी जनार्दन व दुसरा आरोपी अखिल बुढन शेख (वय ५१, राहणार राहाता ) यांना  उत्पादन शुल्क विभागाचे दुय्यम सहायक संजय साठे यांनी या दोन्ही आरोपींना ताब्यात घेऊन बाभळेश्वार येथील बसस्थानकातील शौचालयाकडे लघुशंकेसाठी घेऊन जात असताना अटकेतील आरोपी मयत जनार्दन याने बाभळेश्वार चौकातून जाणाऱ्या अवजड मालवाहतूक ट्रेलरच्या चाकाखाली अचानक उडी घेतल्याने आरोपी जनार्दन याचा जागीच चिरडून मृत्यू झाला.  मयत जनार्दन याने घटनेपूर्वी बाभळेश्वार चौकात असलेल्या एका उपहारगृहात व उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकारी व कर्मचारी यांच्या समवेत नाश्ता केल्याचे घटनेच्या प्रत्यक्षदर्शींनी  सांगितले.  मग जनार्दन याने अचानक का आत्महत्या केली याबाबत वेगवेगळ्या चर्चेला शहरात उधाण आले आहे.

मयत जनार्दन हा पोलीस कोठडीत अटकेत असलेला आरोपी असल्याने त्याच्या मृतदेहाचा पंचनामा प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी याच्या मार्फत करून मयत जनार्दन याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी आज सायंकाळी उशिरा पुणे येथील ससून रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. दुय्यम निरीक्षक नंदू परते यांनी दिलेल्या फिर्यादीवरून लोणी पोलिसांनी या घटनेबाबत अकस्मात मृत्यूचा गुन्हा दाखल केला आहे.

नातेवाईक संतप्त

मयत जनार्दन याचा मृत्यू प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे झाला असल्याचा आरोप जनार्दन याच्या नातेवाइकांनी केला असून त्यांनी लोणी पोलीस ठाण्यात गर्दी केली होती. या घटनेची सीआयडी चौकशी करण्यात येऊन मयत जनार्दन याच्या मृत्यूस कारणीभूत ठरणाऱ्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या बाभळेश्वार येथील अधिकारी कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी संतप्त झालेल्या नातेवाईकांनी केली आहे.