पनवेल : एका पाच वर्षाच्या बाळाच्या विक्रीचा प्रयत्न कामोठे पोलिसांनी पाच दिवसांपूर्वी हाणून पाडला असून यातील मध्यस्थी डॉक्टरसह तीन जणांना पोलीस कोठडी देण्यात आली आहे. या प्रकरणात बाळाच्या आईला ९५ हजार तर मध्यस्थ डॉक्टरला दोन लाख रुपये मिळणार होते.

मुंबई येथील नालासोपारा येथून तळोजा वसाहतीमध्ये राहण्यासाठी आलेल्या २८ वर्षीय एका महिलेला पाच मुले आहेत. दोन मोठी मुले भायखळा येथील मदरशामध्ये असून तिच्यासोबत दोन मुली आणि एक मुलगा तळोजात राहतात. अडीच महिन्यांची आणखी एक मुलगी तिला नुकतीच झाली होती. संबंधित महिलेचा पती तिच्यासोबत राहत नसल्याने ती आर्थिक विवंचनेत होती.

कामोठे पोलीस ठाण्यातील साहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश महाला यांच्या पथकाने हे प्रकरण उघडकीस आणले. कामोठे येथील सेक्टर ८ मध्ये ‘फॅमिली हेल्थ केअर’ या नावाने डॉक्टर पंकज पाटील हे परिसरात सराव करतात. यांच्याकडे एक बाळाची विक्री होत असल्याची माहिती पोलीस अधिकारी महाला यांना समजल्यावर त्यांनी राजस्थानी पालकाचा बनाव करून एक कुटुंब डॉक्टर पाटील यांच्याकडे पाठविले. डॉ. पाटील यांच्यासोबत बनावट पालकांचे सर्व झालेल्या संवादाची पोलिसांनी खात्री पटल्यानंतर बाळ खरेदीसाठी चार लाख रुपयांची रक्कम ठरविण्यात आली. पोलिसांनी रकमेची तरतूद केली. या रकमेच्या बंडलांमध्ये काही बनावट नोटांचा वापर करण्यात आला. अखेर ठरल्याप्रमाणे रक्कम स्वीकारल्यानंतर पोलिसांनी या चौकडीला अटक केली.

कोठडीत डॉक्टर पाटील यांनी व त्यांच्यासह अटक असणाऱ्या महिलांनी काही धक्कादायक खुलासे केले आहेत. यामध्ये चार लाखांच्या विक्रीमध्ये बाळाच्या आईला ९५ हजार मिळणार होते. तसेच बाळाची खरेदी विक्री करण्यासाठी पोलिसांनी बनावट एजंट नेमलेल्या व्यक्तीला २० हजार रुपये आणि अटकेत

असणाऱ्या रुखसार नदीन शेख (२९) आणि रजनी पांडुरंग जाधव (३२) यांना प्रत्येकी ४० हजार रुपये मिळणार होते.