गडचिरोली पोलिसांनी खोटय़ा चकमकीत दोघांना ठार केल्याचा आरोप

पोलिसांनी अबुझमाड जंगल परिसरात खोटी चकमक दाखवून नक्षलवाद्यांशी कुठलाही संबंध नसताना व ते नक्षल सदस्य नसताना सुद्धा आपली पाठ थोपटण्यासाठी राजू दस्सा पुसली व नेलगुंडा येथील प्रकाश चुक्कू मुहंदा या दोन सामान्य नागरिकांची २९ नोव्हेंबरला हत्या केली. त्यामुळे त्यांच्यावर व त्यांच्या कुटुंबीयांवर मोठा अन्याय झालेला आहे. पोलिसांच्या अन्यायाविरोधात मंगळवारी नेलगुंडा परिसरातील आठ ते १० गावातील गावकऱ्यांनी एकत्र येत पायदळ धोडराज पोलीस ठाणे गाठून ठिय्या आंदोलन सुरू केले. आदिवासींना योग्य न्याय मिळेपर्यंत हे आंदोलन सुरूच ठेवू, असा निर्धार व्यक्त करीत ग्रामस्थांनी रात्रभर तिथेच मुक्काम ठोकला. दरम्यान, अतिरिक्त पोलीस अधीक्षक मोहित गर्ग यांनी बुधवारी ग्रामस्थांची भेट घेऊन चौकशीचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

पोलिसांच्या खोटय़ा चकमकीचा ग्रामस्थांनी तीव्र शब्दात निषेध केला आहे. राजू पुसाली व प्रकाश मुहंदा हे दोघेजण गोरखाचे झाड शोधण्यासाठी जंगल परिसरात फिरत असताना पोलिसांनी त्यांना पकडून बेदम मारहाण केली व नक्षल्यांच्या ठिकाणी दाखवून हत्या करण्याची धमकी दिली. त्यानंतर अबुझमाड जंगल परिसरात २९ व ३० नोव्हेंबरला खोटी चकमक दाखवून त्या दोन आदिवासी बांधवांची हत्या करण्यात आली. चकमकीत ठार झालेले नक्षलवादी नसून ते सर्वसामान्य नागरिक होते. त्यामुळे त्यांच्यावर व त्यांच्या कुटुंबीयांवर फार मोठा अन्याय झालेला आहे.

या प्रकरणाची सखोल चौकशी करून ग्रामस्थांना न्याय मिळवू देण्यात यावा, या मागणीसाठी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले. न्याय मिळेपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार असून आपण मुक्कामी राहणार असल्याचा निर्धारही गावकऱ्यांनी व्यक्त केला. नेलगुंडा परिसरातील लोकांच्या आक्रोशामुळे प्रशासनात एकच खळबळ उडाली असल्याचे दिसून येत आहे.

यासंदर्भात गावकऱ्यांनी तहसीलदार भामरागड यांना मागण्यांचे निवेदन सादर केले. परंतु तहसीलदार हजर नसल्याने निवेदन नायब तहसीलदार सीलमवार यांनी स्वीकारले. या आंदोलनात नेलगुंडा परिसरातील ग्रामसभा, नेलगुंडा, भक्कर, मर्दमालेंगा, कवंडे, मिडदापल्ली, गोंगवाडा, परायणार, महाकापाडी, पेनगुंडा, धोडपाडी, दर्भा, दर्भावेला, हितलवार तसेच कुचेर, मुरंगल, कोयर, भुमेवाडा, बोळंगे, जुव्वी, गोलगुंडा, झारेगुंडा, मोरोमेला आदी गावातील शेतकरी व ग्रामस्थ मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते. या ठिय्या आंदोलनामुळे व पोलिसांविरोधात व्यक्त केलेल्या रोषामुळे पोलीस विभागासह जिल्हा प्रशासनात प्रचंड खळबळ उडाली आहे.

‘अबुजमाड जंगलात ठार झालेला नक्षलीच’

अबुजमाड जंगलात पोलीस- नक्षल चकमकीमध्ये दोन नक्षली ठार झाले होते. हे नक्षली मूळचे छत्तीसगड येथील रहिवासी असल्याबाबत व काही वर्षांपूर्वी ते नेलगुंडा परिसरात वास्तव्यास असल्याबाबत पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. या चकमकीनंतर घटनास्थळाचा पंचनामा हा ‘व्हीडीओग्राफी’सह शासकीय पंचांच्या उपस्थितीत व समक्ष पार पडलेला असून घटनास्थळावरून चार रायफल, एक प्रेशर कुकर, वायर, असे मोठय़ा प्रमाणावर साहित्य जप्त करण्यात आले आहे. अबुजमाडच्या कारवाईमुळे नक्षली हादरले असून चकमकीनंतर नक्षली चकमकीत मृत झालेल्यांच्या नातेवाईकांना तसेच ग्रामस्थांना भडकवत आहेत. नक्षलींनी नेलगुंडा गावात बैठक घेऊन ग्रामस्थांना धोडराज येथे जाण्यास भाग पाडल्याची माहिती आहे. धोडराज येथे ३०० ते ४०० नेलगुंडा परिसरातील नागरिक होते. अंधार पडल्यामुळे ते परत जाऊ  शकत नव्हते म्हणून ते परत नेलगुंडा येथे न जाता पोमके धोडराज येथेच असून त्यांच्या राहण्याची व जेवणाची सोयही पोलीस दलाने केली असल्याची माहिती गडचिरोली पोलीस दलाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवली आहे.

या संपूर्ण प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्यात यावी, अशी मागणी मागणी आहे. सध्या आंदोलन मागे घेण्यात आले आहे. परंतु योग्य चौकशी झाली नाही तर पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. – अ‍ॅड. लालसू नगोटी, जि.प.सदस्य, भामरागड