सावंतवाडी : मालवण तालुक्यातील आचरा, तोंडवळी व तळाशील समुद्र किनाऱ्यावर ऑलिव्ह रिडले प्रजातीच्या कासवांच्या संवर्धन उपक्रमाला मोठे यश मिळाले आहे. मंगळवारी आचरा व तोंडवळी–तळाशील किनाऱ्यावरून एकूण ३४२ नवजात कासव पिल्लांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासात सुरक्षितरित्या समुद्रात सोडण्यात आले.

​कांदळवन विभाग, दक्षिण कोकण आणि वनपरिक्षेत्र मालवण (कांदळवन) यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात येत आहे. स्थानिक ‘कासव मित्रांच्या’ सक्रिय सहकार्याने अंडी संवर्धन, त्यांची देखभाल व संरक्षणाचे काम अत्यंत प्रभावीपणे पार पडले. या संपूर्ण प्रक्रियेवर वनपरिक्षेत्र अधिकारी महादेव शिंगाडे व प्राजक्ता पाटील यांनी मार्गदर्शन केले.

​कासवांनी अंडी घातल्यानंतर साधारणपणे ५० दिवसांनी पिल्ले बाहेर येतात. ही पिल्ले नैसर्गिक वातावरणात सुरक्षित राहावीत, यासाठी वनविभागाच्या पथकाने विशेष काळजी घेतली होती. यानंतर योग्य वेळी या ३४२ पिल्लांना समुद्राच्या लाटांच्या हवाली करण्यात आले.
​यावेळी धर्मादाय आयुक्त ओरोस येथील संदीप कुंभार यांच्या हस्ते पिल्लांना समुद्रात सोडण्यात आले.

यावेळी कासव मित्र सूर्यकांत कोचरेकर, गौरेश मालंडकर, ललित देऊलकर, दशरथ कोचरेकर, झकास खवणेकर, सर्वेश पेडणेकर, दीपेश मायबा व नितेश गितये तसेच सर्पमित्र स्वप्नील गोसावी, उद्योजक अजय कोयंडे, स्थानिक ग्रामस्थ व पर्यटक उपस्थित होते. वनविभागाच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून, पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने हा एक आदर्श उपक्रम ठरत आहे.