काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्याचा निर्णय अत्यंत दुर्दैवी आहे. कर्नाटकमधील २०१९ च्या एका सभेतील विधानाचा संदर्भ घेऊन खोटी तक्रार दाखल करत हा निर्णय घेतलेला आहे. राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्याचा प्रयत्न भाजपा मागील काही दिवसांपासून करत होते. हे सर्व जाणीवपूर्वक आणि ठरवून केलेले असून, खासदारकी रद्द करण्याचा भारतीय जनता पक्षाच्या सरकारचा निर्णय हा लोकशाहीचा खून केला आहे, असा घणाघाती हल्ला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.

राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केल्याचे समजात त्याचे पडसाद विधिमंडळात उमटले. महाविकास आघाडीने या घटनेचा निषेध करत सभात्याग केला व विधानभवनच्या पायऱ्यावर काळ्या फिती लावून मोदी सरकारचा धिक्कार केला. यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण , पृथ्वीराज चव्हाण, विरोधी पक्षनेते अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे गटनेते अजय चौधरी, समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अबू आझमी यांच्यासह मविआचे आमदार उपस्थित होते.

त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना नाना पटोले पुढे म्हणाले की, मागील ९ वर्षापासून केंद्रातील मोदी सरकार फक्त निरव मोदी, ललित मोदी, मेहुल चोक्सी, विजय माल्ल्यासारख्या भ्रष्ट लोकांसाठी काम करत आहेत तर राहुलजी देश वाचविण्यासाठी लढत आहेत. देशातील जनतेचे करोडो रुपये घेऊन हे भ्रष्ट उद्योगपती देशाबाहेर पळाले. या भ्रष्टाचाराविरोधात राहुलजी गांधी यांनी सातत्याने आवाज उठवला. अदानी-मोदींच्या संबंधावर लोकसभेत जाब विचारला. केंब्रिज विद्यापीठातील विधानावर राहुल गांधी यांनी माफी मागवी म्हणून विरोधक मागणी करत होते पण राहुलजी गांधी यांना लोकसभेत बोलूही दिले नाही, असंही नाना पटोलेंनी सांगितलंय.

इंग्रज राजवटीत सरकारविरोधात बोलल्यानंतर कठोर शिक्षा दिली जायची, तीच पद्धत भाजपा सरकार आज वापरत आहे.राहुलजी गांधींचा चौकशीच्या नावाखाली आधी ईडीच्या कार्यालयात १०-१० तास छळ केला. शेवटी ते भाजपाच्या दडपशाहीला भीक घालत नाहीत हे दिसल्याने त्यांची खासदारकी रद्द केली. याचा आम्ही निषेध करतो, भाजपा सरकार व मोदी सरकारचा धिक्कार करतो आणि आगामी काळात आम्ही भाजपाविरोधात रस्त्यावर उतरुन आणखी तीव्र संघर्ष करू, असं नाना पटोले म्हणालेत.

यावेळी बोलताना काँग्रेस विधीमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात म्हणाले की, राहुलजी गांधी यांची खासदारकी रद्द करण्याचा निर्णय हा लोकशाहीवरील हल्ला आहे. भारत जोडो यात्रेनंतर भारतीय जनता पक्ष राहुलजी गांधी यांना जास्तच घाबरू लागला आहे. लोकसभेत राहुलजी गांधी यांनी अदानी-मोदी संबंधाचा मुददा उपस्थित केला होता, त्यातूनच भाजपाने सुडबुद्धीने कारवाई केली आहे. केंब्रिज विद्यापीठातील विधानावर लोकसभेत बोलू दिले नाही, त्यांचा माईक बंद करण्यात आला. देशाची वाटचाल लोकशाहीकडून हुकूमशाहीकडे चालली आहे याचा हा पुरावा आहे. स्व. इंदिराजी गांधी यांनी अशाच प्रकारच्या व्यवस्थेचा सामना केला होता आता राहुलजी सुद्धा त्याच व्यवस्थेचा सामना करत आहेत. पण या अत्याचारी व्यवस्थेला तोंड देत इंदिराजी गांधी यांनी जनता पक्षाचा पराभव करत पुन्हा देशाच्या पंतप्रधान झाल्या. राहुलजी गांधीसुद्धा भाजपाचा पराभव करून देशाचे पंतप्रधान होतील, असा विश्वासही थोरात यांनी व्यक्त केला.

narendra modi
धर्माच्या आधारावर आरक्षणाचा प्रयत्न! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काँग्रेसवर आरोप
Ajit Pawar, Rahul Gandhi,
अजित पवारांचे पुन्हा एकदा वादग्रस्त विधान : म्हणाले, “राहुल गांधींचे ‘खटाखट’, तर माझे ‘कचाकचा’…”
eknath shinde
महायुतीच्या सर्व जागा बहुमताने निवडून येणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दावा, म्हणाले ‘शेतकऱ्यांना मदत…’
In Raigad farmers will not be treated unfairly says Uday Samant
रायगडमध्ये शेतकऱ्यांवर अन्याय होणारा निर्णय घेणार नाही, उरणमधील महायुतीच्या सभेत पालकमंत्र्यांची ग्वाही