महापौर तृप्ती माळवी यांचे वाहन रोखून त्यावर झेंडय़ाच्या काठय़ा आपटण्याचा प्रकार करणारे ३४ नगरसेवक व दोन नगरसेविकांचे  पती असे ३६ जण गुरुवारी स्वतहून शाहूपुरी पोलीस ठाण्यात हजर झाले. यांना अटक करून न्यायालयात नेण्यात आल्यानंतर सायंकाळी जामिनावर मुक्तता करण्यात आली. महापौरांना अडचणीत आणण्याच्या प्रयत्नात नगरसेवकांनाच कारवाईला सामोरे जावे लागण्याचे या निमित्ताने दिसून आले.
लाचखोर प्रकरणात अडकल्यानंतर माळवी यांनी महापौरपदाचा राजीनामा द्यावा, यासाठी नगरसेवकांचे दबाव आंदोलन सुरू आहे. दोन फेब्रुवारी रोजी महापालिकेत आयोजित केलेला जनता दरबार कार्यक्रम आवरून महापौर माळवी या महापालिकेच्या वाहनातून घरी निघाल्या होत्या. तेव्हा महापालिकेसमोर लाक्षणिक उपोषणात बसलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नगरसेवक-नगरसेविकांनी महापौरांचे वाहन अडविले. माळवी यांच्या धिक्काराच्या घोषणा देत निषेधाचे काळे झेंडे त्यांच्या वाहनावर आपटले. या दबाव प्रकारानंतर माळवी यांनी लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात आपल्यावर हल्ला झाल्याची फिर्याद नोंदवून ३६ नगरसेवकांवर कारवाई करण्याची मागणी केली.
या प्रकारात संबंधित नगरसेवकांना पोलीस कारवाईला सामोरे जावे लागणार होते. त्यामुळे बदनामी होण्याच्या भीतीमुळे गुरुवारी संबंधित नगरसेवक स्वतहूनच लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात दाखल झाले. पोलिसांनी त्यांना सरकारी मालमत्तेचे नुकसान, बेकायदा जमाव, अडवणूक आदी कलमान्वये अटक केली.
उपमहापौर मोहन गोंजारे, गटनेता चंद्रकांत घाटगे, राष्ट्रवादी गटनेता राजेश लाटकर, स्थायी समिती सभापती आदील फरास आदींसह ३६ जणांना न्यायालयात दाखल करण्यात आले. प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी ए.के.चव्हाण यांनी या सर्वाची वैयक्तिक जामिनावर मुक्तता केली. नगरसेवकांच्या वतीने अ‍ॅड. शिवाजी राणे यांनी काम पाहिले.