मुंबई : केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या मतदारसंघात बोगस कीडनाशकामुळे संपूर्ण पीक जळाल्याचा प्रकार घडला होता. त्यामुळे नुकत्याच जयपूर येथे झालेल्या पश्चिम विभागीय कृषी परिषेदत चौहान यांनी घटकराज्यांच्या कृषिमंत्र्यांना खते, रसायने, बियाणे आणि कीडनाशकांच्या भेसळीवर कठोर कारवाईचे आदेश दिले होते. त्यामुळे राज्य सरकारने प्रत्येक तालुक्यात निरीक्षक नेमण्याचा निर्णय घेतला आहे.

देशातील पश्चिमेकडील राज्याच्या कृषिमंत्र्यांची नुकतीच जयपूर येथे परिषद झाली. या परिषदेत केंद्रीय कृषिमंत्र्यांनी आपल्या लोकसभा मतदारसंघात बोगस कीडनाशकामुळे पीक जळून गेल्याचा प्रकार घडल्याचे सांगितले. राज्यस्थानच्या कृषिमंत्र्यांनी डीएपी खतामध्ये संगमरवर दगडाच्या भुकटीची भेसळ केल्याचा प्रकार घडल्याचे सांगितले. त्यानंतर चौहान यांनी सर्व घटकराज्यांना भेसळ आणि निकृष्ट खते, औषधे, बियाणांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले होते.

त्यानुसार कृषिमंत्री भरणे यांनी तातडीने निर्णय घेत. प्रत्येक तालुक्यात एक किंवा किमान शंभर निविष्ठा विक्रेत्यांमागे एक निरीक्षक नेमण्यात आला आहे. जिल्हास्तरावर एक आणि प्रत्येक विभागाला एक निरीक्षक असणार आहे. प्रत्येक दुकानांची वर्षांतून तीन वेळा म्हणजे खरीप, रब्बी आणि उन्हाळी हंगामात तपासणी होईल. तालुकास्तरावरील अधिकाऱ्यांनी तपासणी केलेल्या विक्रेत्यांपैकी वीस टक्के दुकानांची फेर तपासणी करण्याची सक्ती जिल्हा आणि विभागस्तरावरील निरीक्षकांवर राहणार आहे.

भेसळीची जबाबदारी निश्चित

बियाणे, खते किंवा कीडनाशकांचे उत्पादन ज्या तालुक्यांत होते. त्या ठिकाणीच्या निरीक्षकांनी संबंधित उत्पादनांची तपासणी केल्याशिवाय कोणतीही कृषी निविष्ठेचे वितरण केले जाणार नाही. संबंधित निविष्ठेची तपासणी केल्यानंतर त्या लॉटमधील निविष्ठा निकृष्ट, बोगस आढळून आल्यास संबंधित निरीक्षकाला बडतर्फ केले जाणार आहे. त्यामुळे कनिष्ठांपासून वरिष्ठांपर्यंत सर्व निरीक्षकांच्या जबाबदाऱ्या निश्चित करण्यात आल्या आहेत.

भेसळखोरांवर कठोर कारवाई – कृषिमंत्री

मुख्यमंत्री फडणवीस यांनी २०२५ च्या पावसाळी अधिवेशनात आणि केंद्रीय कृषिमंत्र्यांनी नुकतेच भेसळखोरांवर, निकृष्ट निविष्ठा उत्पादकांवर कठोर कारवाईचे आदेश दिले होते. राज्यात विभाग, जिल्हा आणि तालुकास्तरावर सुमारे ८५० निरीक्षक (तंत्र अधिकारी) कार्यरत असतील. प्रत्येक अधिकाऱ्याला जबाबदारी निश्चित करून दिली आहे. कोणत्याही परिस्थितीत बोगस, भेसळयुक्त निविष्ठांची विक्री होऊ दिली जाणार नाही. भेसळखोरांवर कठोर कारवाई केली जाईल, अशी माहिती कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.