रत्नागिरी – पक्षशिस्त मोडीत काढत शिवसेनेच्या अधिकृत उमेदवाराविरोधात बंडखोरी करणाऱ्या परशुराम कदम यांच्यावर अखेर कारवाईचा बडगा उगारण्यात आला असून, त्यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
माजी जिल्हा परिषद सभापती तथा शिंदे गटातील शिवसेनेचे युवा सेना कोकण विस्तारक पद भूषविणारे परशुराम कदम यांनी पक्षसंघटनेच्या विरोधात जाऊन थेट बंडाचे निशाण फडकावल्याने ही कठोर कारवाई करण्यात आली आहे.
जिल्हा प्रमुख राहुल पंडित यांनी प्रसिद्धीस दिलेल्या जाहीर पत्रकात स्पष्टपणे नमूद केले आहे की, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक २०२६ मध्ये रत्नागिरी तालुक्यातील ३५ हातखंबा जिल्हा परिषद गटातून शिवसेनेचे अधिकृत उमेदवार श्री. सुयोग नंदकुमार कांबळे यांच्या विरोधात परशुराम कदम यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल केली आहे. हे कृत्य म्हणजे थेट शिवसेना पक्ष, नेतृत्व आणि संघटनेशी केलेली गद्दारी असून ते निवडणुकीत उघडपणे पक्षविरोधी भूमिका घेत आहेत.
पक्षशिस्त, संघटनात्मक धोरणे आणि शिवसेनेच्या निर्णयांना हरताळ फासणाऱ्या या बंडखोर भूमिकेची गंभीर दखल घेत, परशुराम मारुती कदम यांची त्यांना दिलेल्या सर्व पदांवरून तसेच शिवसेना पक्षातून तात्काळ हकालपट्टी करण्यात येत आहे, असा स्पष्ट इशारा जिल्हा प्रमुख राहुल पंडित यांनी दिला आहे. या कारवाईमुळे शिवसेनेत शिस्तभंगाला कोणतीही माफी नाही आणि पक्षविरोधी कारवाया खपवून घेतल्या जाणार नाहीत, असा ठाम संदेश संघटनेने दिला आहे.

