फलटण येथे धनगर समाजाच्या चक्का जाम आंदोलनाला हिसक वळण लागले. आंदोलकांनी नाना पाटील चौकात आंदोलन करत असताना एस टी बस स्थानकात घुसून बाहेरगावी जाण्यासाठी उभ्या असणाऱ्या बसवर दगडफेक केली. बस नियंत्रण कक्षाचीही मोडतोड केली. दगडफेकीमुळे दोन शाळकरी मुलीसह एक महिला जखमी झाली.
आज सकाळी दहा  वाजता क्रांतिसंह नाना पाटील चौकात धनगर समाजाला अनुसूचित जती जमातीत आरक्षण मिळावे, म्हणून किमान दोन हजार आंदोलकांचा जमाव जमला होता. या वेळी आंदोलकांसमोर वक्त्यांनी अतिशय तीव्र भावना व्यक्त केल्या. यामुळे आंदोलनाला हिंसक वळण लागले. आंदोलक एस. टी. बस स्थानकात घुसले, त्यांनी अकरा बसची मोडतोड करत जोरदार दगडफेक केली. बस नियंत्रक कक्षाचीही मोडतोड करण्यात आली. िहसक आंदोलनामुळे फलटण शहर ताबडतोब बंद झाले. सकाळपासून एस. टी. बस सेवा बंद राहिल्यामुळे शालेय विदयार्थी, शासकीय कामासाठी आलेल्यांचे फारच हाल झाले. हॉटेल सेवाही बंद राहिल्याने सर्वानाच उपाशीपोटी रहावे लागले. कित्येक किमीची पायपीट करुन शालेय विदयार्थ्यांना आपले घर गाठावे लागले.  अचानक उद्भवलेल्या परिस्थितीमुळे नागरिकांनाही त्रासाला सामारे जावे लागले . रुग्णांचीही अतिशय बिकट अवस्था झाली. या प्रकरणी सायंकाळपर्यंत पोलिसानी कोणालाही ताब्यात घेतले नव्हते. दुपारी तीन नंतर आंदोलन स्थगित करण्यात आले. पोलीस निरीक्षक ए. डी फडतरे यांनी परिस्थिती व्यवस्थित हाताळली.
वाई चक्का जाम आंदोलन
वाई-धनगर समाजाला अनुसूचित जातीत आरक्षण मिळावे यासाठी आज वाई शहरात एस टी बस स्थानकासमोर चक्का जाम आंदोलन करण्यात आले.या वेळी दोन तास वाहतूक बंद करण्यात आली. सतीश शेडगे, राजाभाऊ खरात, बुवा खरात यांची भाषणे झाली. धुवा ठोबरे, विठठल हाके, आबा खरात, सचिन खरात, श्रीरंग कचरे आणि किसन कचरे आदी या वेळी उपस्थित होते.या वेळी पोलीस निरीक्षक रमेश गलांडे यांनी परिस्थिती व्यवस्थित हाताळली.