स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाशी संलग्न ८४ महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांनी प्रवेश घेऊ नये, असे आवाहन महाविद्यालय व विद्यापीठ विकास मंडळाचे संचालक डॉ. दीपक पानसकर यांनी केले आहे. नांदेड जिल्ह्य़ातील २७, लातूर ३८, परभणी १२ व हिंगोली जिल्ह्य़ातील ७ महाविद्यालयांचा यात समावेश आहे.
महाराष्ट्र विद्यापीठ अधिनियम १९९४ कलम ८६नुसार महाविद्यालयात शिकविल्या जाणाऱ्या विविध अभ्यासक्रमांचे नूतनीकरण शुल्क या ८४ महाविद्यालयांनी जमा केले नाही. दि. १७ जूनपर्यंत याची मुदत दिली होती. पण मुदतीत महाविद्यालयांनी शुल्क न भरल्यामुळे प्रवेश प्रक्रिया थांबविण्यात आली आहे. या महाविद्यालयांतील प्रवेश नियमबाह्य़ ठरतील, म्हणून या महाविद्यालयात विद्यार्थ्यांनी प्रवेश घेऊ नये. या बाबतची सर्वस्व जबाबदारी संबंधितांवर राहील, असे डॉ. पानसकर यांनी म्हटले आहे.