सातारा : कास पठार, ठोसेघर परिसरात गर्दी करणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई

करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सध्या सर्व पर्यटन स्थळे बंद आहेत.

सातारा : करोना संसर्गामुळे करण्यात आलेल्या टाळेबंदीच्या काळात कास पठार आणि ठोसेघर परिसरात पर्यटकांची होत असलेली गर्दी.

करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सध्या सर्व पर्यटन स्थळे बंद असताना कास पठार परिसरात स्थानिक नागरिक आणि पर्यटक गर्दी करीत असल्याचे चित्र आहे. यापार्श्वभूमीवर कास रस्त्यावरील काही हॉटेलांवर आणि पर्यटकांवर नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी सातारा पोलिसांनी कारवाई केली आहे. या कारवाईत ७२ वाहनांवर कारवाई करीत पोलिसांनी १७ हजार ९०० रुपयांचा दंड वसूल केला.

करोना संसर्गात मंदिरे आणि पर्यटनस्थळे बंद आहेत. पाचगणी महाबळेश्वर बंद ठेवून स्थानिकांनी कडकडीत बंद पाळला आहे. सध्याच्या पावसाने कास ठोसेघर हा परिसर हिरवागार झाला आहे. या पठारावर हुल्लडबाजी करणाऱ्यांची गर्दीही वाढत आहे. शनिवारी सातारा तालुका पोलिसांनी यवतेश्वर नाक्यावर कास पाठाराकडे गेलेल्या सातारा शहरातील युवक युवतींना अडवत त्यांच्यावर कारवाई केली. या परिसरात फिरण्यास मज्जाव असतानाही सातारकर करोना संसर्गाचे कोणतेही नियम न पळता गर्दी करीत असल्याने पोलिसांनी ही कारवाई केली.

सातारा ते कास या भागात दिलेल्या वेळेपेक्षा ज्यास्त वेळ हॉटेल चालू ठेवल्याने जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन झाले होते. त्यामुळे हॉटेल किनारा, कास हिल रिसॉर्ट, ईगल, ॠणानुबंध, ब्लु व्हॅली, स्वराज्य या हॉटेलांवर कारवाई करीत त्यांच्या मालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

कास पठार आणि परिसरात फिरण्यासाठी येणाऱ्या वाहनांवर मोटार वाहन कायद्याप्रमाणे ७२ गुन्हे दाखल करुन १७ हजार ९०० रुपये तडजोड शुल्क वसूल करण्यात आला आहे. तसेच यापुढेही अशाच प्रकारची सक्त कारवाई करण्यात येणार असल्याने कोणीही विनाकारण कास पठार, ठोसेघर धबधबा परिसरामध्ये फिरण्यासाठी येऊ नये, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Action taken by satara police for making crowd in kas plateau and thoseghar area aau

ताज्या बातम्या