राहाता : तामिळनाडू विधानसभा निवडणूक निकालांची प्रतीक्षा लागलेली असतानाच, दाक्षिणात्य सुपरस्टार आणि तमिळगा वेत्री कळघम (टीव्हीके) पक्षाचा सर्वेसर्वा थलापती विजय याने आज, बुधवारी शिर्डीत येऊन श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले.
थलापती विजय साईदर्शनाला आल्याची माहिती समजताच चाहत्यांनी मंदिर परिसरात मोठी गर्दी केल्याने सुरक्षा यंत्रणेची मोठी तारांबळ उडाल्याचे दिसले. थलापती विजय याने उपस्थित चाहत्यांना अभिवादन करीत शुभेच्छांचा स्विकार केला.
साईबाबांच्या मध्यान्ह आरतीनंतर साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतल्यांनतर त्याने गुरुस्थान व द्वारकामाईत जाऊन दर्शन घेतले. मंदिर परिसरात असलेल्या ध्यान कक्षात बसुन त्याने काहीवेळ ध्यानधारणा केली. श्री साईबाबा संस्थानच्या वतीने थलापती विजय यांचा सत्कार करण्यात आला.
राजकीय प्रवासातील पहिल्याच मोठ्या निवडणूक परीक्षेला सामोरे जाण्यापूर्वी तमिळगा वेत्री कळघम (टीव्हीके) पक्षाचा सर्वेसर्वा थलापती विजय याने साईचरणी नतमस्तक होत विजयासाठी साकडे घातले. तामिळनाडूच्या राजकारणात थलापती विजय यांचा हा प्रवेश अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. निकालाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी घेतलेले साईदर्शन महत्वाचे मानले जात आहे. प्रसार माध्यमांशी बोलण्यास त्याने नम्रपणे नकार दिला.
