नाशिकमधल्या अशोक खरातचं प्रकरण राज्यात चांगलंच गाजलं. महिलांचं लैंगिक शोषण केल्या प्रकरणी त्याला अटकही झाली. तसंच त्याने केलेले किळसवाणे प्रकारही समोर आले आहेत. या भोंदू अशोक खरातला कठोरातली कठोर शिक्षा होईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही सांगितलं आहे. अशोक खरातला गुरु मानून त्याची पाद्यपूजा केल्याचे फोटो व्हायरल झाल्याने रुपाली चाकणकरांना महिला आयोगाचं अध्यक्षपद सोडावं लागलं. रुपाली चाकणकर यांनीही समोर येऊन अशोक खरातशी कुठलाही आर्थिक व्यवहार झाला नसल्याचं म्हटलंय. आता हा विषय पुन्हा चर्चेत आलाय अशोक खरातवर येणाऱ्या चित्रपटामुळे. अभिनेत्री आणि शिवसेना नेत्या दीपाली सय्यद या चित्रपटात रुपाली चाकणकरांची भूमिका साकारणार आहेत. मात्र रुपाली चाकणकरांची भूमिका करु नका हे सांगून आपल्यावर राजकीय दबाव आणला जातोय असं आता दीपाली सय्यद यांनी म्हटलंय. हे प्रकरण काय आहे? दीपाली सय्यद यांनी काय म्हटलंय आपण जाणून घेऊ.
महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स नावाच्या चित्रपटात काय?
दिग्दर्शक स्वरूप बी सावंत यांचा ‘महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स’ नावाने भोंदू अशोक खरातच्या काळ्या कृत्यावर आधारित सिनेमा लवकरच येतो आहे. या चित्रपटात दीपाली सय्यद रुपाली चाकणरांची भूमिका करत आहेत. मात्र आता दीपाली सय्यद यांनी आपल्याला फोनवरुन इशारे दिले जात असल्याचं म्हटलंय. अशोक खरात प्रकरणावरचा चित्रपट करू नका, हा रोल करू नका, असे म्हणत काहीजण थोडसं थांबायला सांगत आहेत. माझ्यावर राजकीय दबाव आणला जातो आहे. तुमचं राजकीय करिअर उद्ध्वस्त करू असा मला महिला नेत्यांचा फोन आला होता, असं दिपाली सय्यद यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स चित्रपटाला असलेली ‘आता सगळं उघड होणार…!’ ही टॅगलाईनच बरंच काही सांगून जाते. हा चित्रपट अनेकांचा पर्दाफाश करणार असल्याचे संकेत देण्यासाठी पुरेशी आहे. आता हा चित्रपट कोणकोणत्या गोष्टी उघड करतो, ते प्रदर्शनानंतरच समजेल.
काय म्हणाल्या दीपाली सय्यद?
चित्रपटाची स्क्रिप्ट काय ते मी सांगू शकत नाही. मी ते वाचते आहे सध्या, मला ते २६ मे रोजी मिळालं आहे. रुपाली चाकणकरांची भूमिका कराल का हे मला विचारण्यात आलं आहे. त्यासंबंधीच्या बातम्या मीडियातही आल्या आहेत. मी चार महिने बिग बॉसच्या घरात होते, त्यामुळे मला अशोक खरात प्रकरण काय ते माहीत नव्हतं. सगळ्या गोष्टी बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यावर कळल्या. या प्रकरणात अनेक मोठे लोक आहेत असंही कळलं. श्रद्धा आणि अंधश्रद्धा यात एक धूसर रेष असते ती ओळखता आली पाहिजे. शिवाय जे काही घडलं आहे ते लोकांना समजलं पाहिजे. स्क्रिप्ट वाचतानाच मला ते लक्षात आलेलं आहे. मला रोलसाठी विचारणा करण्यात आली आहे. मी होकार दिला तर पुढच्या महिन्यापासून शुटिंग सुरु होईल कारण ऑक्टोबरमध्ये सिनेमा रिलिज होणार आहे असं दीपाली सय्यद म्हणाल्या. दीपाली सय्यद यांनी एबीपी माझाशी संवाद साधला, त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली.
जो दिशा दाखवतो तो गुरु असतो ना?
गुरू कुणाला मानतो आपण? जो माणूस आपल्याला दिशा दाखवतो, काहीतरी शिकवतो. प्रत्येकाचे पहिले गुरु हे त्याचे आई वडील असतात. त्यानंर आपल्याला शिकवणारे शिक्षक असतात. अशोक खरात कसला गुरु होता? मला कल्पना नाही. पण मी ऐकलंय की तो काहीतरी नंबर्स काढायचा. कुठलं तरी पाणी प्यायला द्यायचा असं कोण असतं? अशा पद्धतीने वागणारे गुरु कसे काय? तुम्ही विश्वास कुणावर ठेवायचा? गुरु मानल्यावर तो दिशा दाखवायचं काम करतो, खरातबाबत मी सध्या सगळं वाचते आहे असंही दीपाली सय्यद म्हणाल्या.

होय, माझ्यावर राजकीय दबाव आणला जातोय-दीपाली सय्यद
कलाकारांना कुणी प्रेशर देऊ नये. मी काम करते आहे, मला अडवणं चुकीचं आहे. कला सादर करण्यापासून अडवलं जात असेल तर ते योग्य नाही. मला काही महिला नेत्यांचे फोन आले. तुम्ही रुपाली चाकणकरांची भूमिका करु नका, थोडं थांबून विचार करा. राजकीय दबाव आणला जातो आहे. तुमचं राजकीय करिअर उद्ध्वस्त करतील हे सांगत महिला नेत्यांनी मला फोन केले आहेत. रुपाली चाकणकरांचा रोल मी करते आहे हे आता सगळ्यांनाच कळलं आहे. मुळात असा काही फोन येणं चुकीचं आहे. रुपाली चाकणकरांचाच फोन आला का? असं विचारलं असता दीपाली सय्यद नाही म्हणाल्या. मी त्या महिला नेत्यांचं नाव सांगणार नाही. पण माझ्यावर राजकीय दबाव आणला जातो आहे. पण मी या कुठल्याही प्रेशरला घाबरत नाही. मी आता हा सगळा विषय एकनाथ शिंदेंशी बोलणार आहे. त्यांच्यासमोर मी सांगेन की अमुक व्यक्तींचे फोन येत होते. असं दीपाली सय्यद यांनी म्हटलं आहे. मी कुणाचीही संमती घेऊन काम करत नाही. मी कलाकार म्हणून मला भूमिका आवडली तर मी नक्कीच करणार. स्क्रिप्ट वाचून झाल्यावर मी योग्य काय ते ठरवेन. पण कुठल्याही प्रेशरला मी घाबरत नाही.
