अलिबाग – लोकसहभाग, सकारात्मक दृष्टीकोन आणि सातत्यपुर्ण प्रयत्न असतील तर दुष्काळी गावही समृद्ध ग्राम बनू शकते हे पुणे जिल्ह्यातील आडाची वाडी ग्रामपंचायतीने हेच दाखवून दिले आहे, राज्यातील इतर ग्रामपंचायतींनी या गावाचा आदर्श समोर ठेवला तर प्रत्येक गाव समृद्ध बनू शकेल असा विश्वास रायगडचे निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के यांनी व्यक्त केला.
ते अलिबाग प्रेस असोसिएशनच्या वर्धापन दिना निमित्ताने आयोजित वार्तालाप कार्यक्रमात बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री समृद्ध ग्रामपंचायत अभियानात राज्यात प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या पुरंदर तालुक्यातील आडाची वाडी गावाच्या मागील १३ वर्षातील वाटचालीचा पट उलगडून सांगितला. आडाची वाडी हे गाव दुष्काळी प्रदेशातील गाव म्हणून ओळखले जात होते. पाण्याच्या समस्येमुळे गावातील लोक स्थलांतरीत होत होती. महिलांना पाण्यासाठी वणवण फिरावे लागत होते. नातेवाईक गावात येण्यास फारसे उत्सूक नसत, पण सातत्यपूर्ण सामुहीक प्रयत्न करून गावाने दुष्काळी परिस्थितीवर मात केली. जलसंधारणाच्या कामामुळे गावातील विहीरी पाझर तलाव पाणीदार झाल्या.
शासनाच्या विवीध योजनांचा लाभ गावात प्रत्येक गावात पोहोचावा यासाठी प्रयत्न केले. अंजीर शेती आणि दुग्ध व्यवसायातून गावात आर्थिक सुबत्ता आणली. लोकांचे दरडोई उत्पन्न वाढविण्यासाठी प्रयत्न केले. यानंतर गावात भौतीक सुविधांच्या उभारणीसाठी लोकसहभागातून प्रयत्न केले. केवळ शासनाच्या मदतीवर अवलंबून न राहता, सामाजिक दायित्व निधीच्या माध्यमातूनही गावात विकास कामे केली.
विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका सुरू केली. गावात सुसज्ज व्यायामशाळा बांधली, अत्याधुनिक ग्रामपंचायत भवनची उभारणी केली. गावात सौर उर्जेवर चालणारे कृषी पंप, पथ दिवे बसविले, घरोघरी शुध्द पाणी पुरवठा व्हावा यासाठी आर ओ फिल्टर उपलब्ध करून दिले. प्रत्येक घर सौर उर्जेने प्रकाशमान केले, देणग्यांच्या माध्यमातून गावातील शाळेचा विकास केला. उद्यान आणि स्माशानभूमी परिसर विकसीत केला. शासनाच्या विवीध योजनांचा लाभ गावातील जास्तीत जास्त नागरिकांना मिळावा यासाठी प्रयत्न केले. शहरांतील रस्त्यांना लाजवतील असे पाणंद रस्ते विकसीत केले. जलसंधारणाची व्यापक कामे केली यामुळे दुष्काळावर मात करता आली. त्यामुळे गावाकडे बघण्याचा इतरांचा दृष्टीकोन बदलला.
रायगड जिल्ह्यातील गावांनी आडाची वाडीचा आदर्श समोर ठेऊन आपला विकास केला. तर गावाचे आणि गावांतील लोकांचे जीवनमान समृध्द होऊ शकेल असा विश्वास निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के यांनी यावेळी व्यक्त केला.
