सावंतवाडी: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या कुडाळ तालुक्यातील आंजिवडे गावात ‘अदानी ग्रीन एनर्जी’चा २१०० मेगावॉट क्षमतेचा महाकाय पंप स्टोरेज प्रकल्प आणि सावंतवाडी तसेच दोडामार्ग तालुक्यातील तब्बल १३ पर्यावरणीय संवेदनशील गावांतून प्रस्तावित असलेला शक्तीपीठ महामार्ग, या दुहेरी विकास प्रकल्पांमुळे पश्चिम घाटातील मौल्यवान वृक्षसंपदा आणि दुर्मिळ जैवविविधता धोक्यात येण्याची गंभीर शक्यता निर्माण झाली आहे.
अदानी समूहाचा हा २१०० मेगावॉट वीजनिर्मितीचा प्रकल्प कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सीमेवरील आंजिवडे डोंगरभागात ‘पाटगाव पंप स्टोरेज प्रकल्प’ या नावाने प्रस्तावित आहे. या आराखड्यानुसार कोल्हापूरच्या भुदरगड तालुक्यातील पाटगाव धरणाचा वापर ‘वरचा जलाशय’ आणि कुडाळ तालुक्यातील आंजिवडे गावाजवळ नवीन ‘खालचा जलाशय’ उभारून वीजनिर्मितीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यापूर्वी भुदरगड येथे विरोध झाल्यानंतर कंपनीने प्रकल्पासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कर्ली नदीतून पाणी उचलण्याची मंजुरी मिळवली होती. मध्यंतरी हा प्रकल्प रद्द झाल्याची चर्चा रंगली होती; मात्र तो अजूनही प्रस्तावित असल्याचे उघड झाले आहे.
हा प्रकल्प प्रत्यक्ष कार्यान्वित करण्यासाठी या भागातील घनदाट जंगलात बेसुमार वृक्षतोड करावी लागणार आहे. परवानगी घेऊन वृक्षतोड केली तरी आंजिवडेसारखे समृद्ध आणि नैसर्गिक जंगल पुन्हा उभे राहणे अशक्य असल्याचे पर्यावरणतज्ज्ञांचे म्हणणे आहे. दुसरीकडे, नागपूर-गोवा शक्तीपीठ महामार्ग सावंतवाडी व दोडामार्ग तालुक्यातील ज्या १३ गावांतून जाणार आहे, ती सर्व गावे सह्याद्री घाटात मोडणारी आणि पर्यावरणदृष्ट्या अत्यंत संवेदनशील (इको सेन्सिटिव्ह) आहेत. या भागात दुर्मिळ आणि मौल्यवान वनस्पती, औषधी वनस्पती, वाघांसह विविध वन्यजीव आणि पक्ष्यांच्या प्रजाती आढळतात. तसेच सह्याद्रीच्या या घाटातूनच पश्चिमेकडे समुद्राला मिळणारे अनेक नैसर्गिक पाण्याचे स्त्रोत व नद्यांचे प्रवाह उगम पावतात, ज्याचा थेट फायदा पायथ्याशी असलेल्या अनेक गावांना मिळतो.
दरम्यान, शक्तीपीठ महामार्गाबाबत उपविभागीय महसूल अधिकाऱ्यांनी गावागावांत घेतलेल्या जनसुनावणीदरम्यान स्थानिक ग्रामस्थांनी या प्रकल्पाला तीव्र विरोध दर्शवला आहे. या संदर्भात ज्येष्ठ पर्यावरणप्रेमी डॉ. जयेंद्र परुळेकर यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी सह्याद्रीच्या या संवेदनशील पट्ट्यातील संभाव्य विनाशाबाबत तीव्र चिंता व्यक्त केली. निसर्ग व पर्यावरण वाचवण्यासाठी स्थानिक जनतेने आणि पर्यावरणप्रेमींनी संघटित होऊन लढा देण्याची गरज असल्याचे सांगत, याविरोधात लवकरच आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यात येईल, असा मनोदय त्यांनी व्यक्त केला.
