व्यसनाधीनता हा देशाला लागलेला शाप आहे. त्यामुळे आजवर अनेक कुटुंबे उध्वस्त झाली. गरिबीच्या चक्रात अडकली. गरिबी हटाओचा नारा देऊन देशातील गरिबी हटणार नाही. त्याकरिता व्यसनमुक्तीसाठी आधी प्रभावीपणे काम करण्याची गरज
आहे, असे मत माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनी येथे व्यक्त केले. अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवामार्ग आणि त्र्यंबकेश्वर येथील श्री स्वामी समर्थ गुरूपीठ यांच्यावतीने शनिवारी आयोजित आदिवासी महिला मेळावा आणि भाऊबीज सोहळा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. त्याप्रसंगी त्या बोलत होत्या.
पेठ रस्त्यावरील बाजार समितीच्या आवारात झालेल्या सोहळ्यास अण्णासाहेब मोरे, पालकमंत्री छगन भुजबळ, आदिवासी विकासमंत्री मधुकर पिचड, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, तिरूपती बालाजी संस्थानचे अध्यक्ष बप्पी राजू आदी उपस्थित होते. देशात महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढत असल्याबद्दल पाटील यांनी चिंता व्यक्त केली. महिलांप्रती बघण्याचा दृष्टीकोन बदलणे आवश्यक आहे. त्यासाठी शिक्षणाची गरज आहे. आदिवासी समाजातील नागरिकांचा आदर्श इतर समाजांनी घेतला पाहिजे. या समाजात हुंडा न घेता विवाह केला जातो, असे पाटील यांनी नमूद केले. आदिवासी विकासमंत्री पिचड यांनी राज्यातील आदिवासी विद्यार्थ्यांना आता बस प्रवास मोफत राहणार असल्याचे जाहीर केले. आदिवासी महिलांना स्वयंरोजगारासाठी आदिवासी विकास विभागाकडून ५० हजार रूपयांची मदत दिली जाणार आहे. तसेच बर्डा भील या जातीच्या विकासासाठी २५ कोटींचा निधी राखीव ठेवला जाणार असल्याचे पिचड यांनी सांगितले.
पालकमंत्री भुजबळ यांनी भाऊबीज सोहळ्याचा धागा पकडून आसाराम बापूवर टीकास्त्र सोडले. स्वामी समर्थ गुरूपीठाने भाऊबीज सोहळ्याच्या माध्यमातून महिलांचा सन्मान केला आहे. आसाराम बापूने याची शिकवण घेण्याची आवश्यकता असल्याचे भुजबळ यांनी सांगितले. सोहळ्यात कविता राऊत, अंजना ठमके, संजीवनी जाधव या नाशिकच्या धावपटूंसह शिल्पा ठोकडे, राजलक्ष्मी शिनकर, ज्योती सिंग, तृप्ती अंधारे, प्रेरणा देशभ्रतार, अनिता पाटील, प्रमिला कोकड, जिजाबाई शिंदे, मेघाली देवरगावकर, ताराबाई शिरसाठ, वंदना साळुंखे, प्रियदर्शनी बोरकर या विविध क्षेत्रात कर्तत्व गाजविणाऱ्या महिलांचा सत्कार करण्यात आला.