आगामी पंधरा दिवसात ठरणार तिसऱ्या लाटेचे भवितव्य- अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी

गणेशोत्सव काळातील गर्दी, पावसाळा संपत असल्याने मुंबईतील बांधकाम व्यवसाय व अन्य कामांसाठी येणारा मजूरवर्ग तसेच गणेशोत्सव काळात कोकणात गावी गेलेला वर्ग परतल्यानंतरचे १५ दिवस अत्यंत महत्वाचे

Additional municipal commissioner Suresh Kakani, Covid, Covid 19,
आगामी पंधरा दिवस हे यादृष्टीने अत्यंत महत्वाचे असून याच काळात करोनाच्या तिसऱ्या लाटेचे भवितव्य निश्चित होईल, असे अतिरिक्त पालिका आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले.
  • संदीप आचार्य
    करोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर करोना रुग्णवाढ होऊ नये यासाठी गणेशोत्सवात काटेकोर काळजी घेण्यात आली होती. तसेच आगामी काळात येणारे सण साजरे करताना मुंबईकरांनी करोनाच्या नियमांचे जास्तीत जास्त पालन करावे यासाठी महापालिका प्रयत्नशील आहे. आगामी पंधरा दिवस हे यादृष्टीने अत्यंत महत्वाचे असून याच काळात करोनाच्या तिसऱ्या लाटेचे भवितव्य निश्चित होईल, असे अतिरिक्त पालिका आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले.

राज्य सरकारने गेल्या महिनाभरात हॉटेल- रेस्तराँच्या वेळेसह अनेक गोष्टींवरील निर्बंध शिथिल केले. दहीहंडीवर निर्बंध होते तर गणेशोत्सव साजरा करताना जास्तीत जास्त काळजी घेण्याचे राज्यशासन व पालिकेचे प्रयत्न होते. यामुळेच सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यापासून विसर्जन कालावधीपर्यंत पालिकेने काटेकोर काळजी घेतली. याचाच परिणाम म्हणून काही प्रमाणात गर्दी होऊनही मुंबईत करोना रुग्ण व मृत्यूचे प्रमाण वाढले नाही. मात्र गणेशोत्सव काळातील गर्दी, पावसाळा संपत असल्याने मुंबईतील बांधकाम व्यवसाय व अन्य कामांसाठी येणारा मजूरवर्ग तसेच गणेशोत्सव काळात कोकणात गावी गेलेला वर्ग परतल्यानंतरचे १५ दिवस अत्यंत महत्वाचे ठरणार असल्याचे सुरेश काकाणी यांनी सांगितले. त्यादृष्टीने चाचण्यांची संख्या वाढविण्यात आली असून चाचण्या व आवश्यक तपासणी करण्यासाठीची ठिकाणेही निश्चित करण्यात आली आहेत. गेल्या काही दिवसात मुंबईत जी करोनारुग्ण वाढ झाली आहे ती प्रामुख्याने सोसायट्यांमध्ये झाली असून मुंबईतील गरीबवस्ती तसेच झोपडपट्टीत ही वाढ झाली नसल्याचे अतिरिक्त आयुक्त काकाणी म्हणाले. आगामी पंधरा दिवसात जर करोना रुग्णांची वाढ झाली नाही तर तिसरी लाट आटोक्यात आली असे मानता येऊ शकते.

अर्थात महापालिका पूर्णपणे सावध असून तिसरी लाट आल्यास त्याचा सामना करण्याची पूर्ण सज्जता करण्यात आल्याचे सुरेश काकाणी यांनी सांगितले. जवळपास तीस हजार खाटांची तयारी ठेवली असून ऑक्सिजनची कमतरता पडणार नाही याचे नियोजन करताना लहान मुलांसाठी सर्व प्रकारची व्यवस्थापन करण्यात आले आहे. या तीस हजार खाटांमध्ये १५ हजार ऑक्सिजन खाटा तर अतिदक्षता विभागात ४ हजार खाटा असतील. करोनाच्या दुसऱ्या लाटेत २१ हजार खाटांची व्यवस्था केली होती. त्यावेळचा रुग्णवाढीचा दर लक्षात घेऊन यावेळी संपूर्ण नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे आवश्यकतेनुसार म्हणजे रुग्णवाढीचा वेग लक्षात घेऊन खाटांसह डॉक्टर आदीचे नियोजन केले आहे. करोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यावेळी उडालेली धावपळ लक्षात घेऊन ऑक्सिजन वापराच्या नियोजनासह ऑक्सिजन उपलब्धतेचा विचार करण्यात आला आहे.

करोनाच्या तिसऱ्या लाटेचा फटका हा प्रामुख्याने लहान मुलांना बसेल असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे, याचा विचार करून लहान मुलांसाठी स्वतंत्रपणे अतिदक्षता विभागाची व्यवस्था करण्यात आली आहे. या मुलांसाठी आवश्यक ती सर्व उपकरणे व यंत्रसामग्री घेण्यात आली आहे. महत्वाचे म्हणजे करोनाची लागण मुलांना झाल्यास तात्काळ उपचार मिळावे यासाठी बालरोगतज्ज्ञांच्या संघटनांची समिती तसेच शासनाने नेमलेल्या कृती दलाच्या मार्गदर्शन तत्वानुसार कसे उपचार करायचे याचे प्रशिक्षण देण्याचे काम महापालिका रुग्णालयातील डॉक्टर तसेच तज्ज्ञांच्या माध्यमातून आतापर्यंत पाचवेळा करण्यात आले आहे. ही लढाई सर्वांची असल्याने मुंबईतील सर्व खाजगी डॉक्टरांसाठी आम्ही प्रशिक्षण शिबीरे घेतली आहेत. पालिकेच्या २४ विभागात कोणत्याही करोना रुग्णाला तात्काळ मदत तसेच उपचारासाठी मार्गदर्शन मिळेल याची तरतूद करण्यात आली आहे.

एकीकडे मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे तर दुसरीकडे चाचणी केंद्रांच्या माध्यमातून जास्तीत जास्त चाचण्या केल्या जात आहेत. रुग्ण संपर्कातील लोकांचा तात्काळ शोध आदी अनेक सर्वंकष विचार तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी करण्यात आला असून कोकणातून गणेशोत्सवानंतर परतणारा वर्ग तसेच कामानिमित्त अन्य राज्यातून येणारा मजूर यावर आमचे लक्ष आहे. यासाठी अशी ठिकाणे यापूर्वीच शोधण्यात आली असून आरोग्य विभागाचे कर्मचारी तेथे योग्य ती काळजी घेतली. तिसरी लाट रोखण्यासाठी मुंबई महापालिकेन सर्व शक्ती पणाला लावली असून लोकांनीही मास्कचा वापर, सुरक्षित अंतर व हात स्वच्छ धुण्याबरोबर आवश्यक ती काळजी घेतल्यास तिसरी लाट नियंत्रित होऊ शकते असा विश्वास सुरेश काकाणी यांनी व्यक्त केला.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Additional municipal commissioner suresh kakani on covid third wave sgy