रत्नागिरी : पत्नीच्या चारित्र्याचा संशय घेत तिचा काठीने आणि दगडाने ठेचून खून केल्याच्या आरोपावरून प्रदीप खोचरे (या. निळीक, ता. खेड) याला खेड येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश ए. एस. आवटे यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

आरोपी खोचरे आपल्या पत्नी सुवर्णा  हिच्या चारित्र्याबाबत नेहमी संशय घेत असे. यातून त्यांची अनेकदा वादावादी होत असे. १६ जून २०१५ रोजी सकाळी सुवर्णा प्रातर्विधीसाठी गेली असता खोचरे तिच्या मागोमाग गेला आणि ती बेसावध असताना डोक्यावर काठीचा तडाखा देऊन जखमी केले. त्यामुळे ती खाली पडली असता आरोपीने दगडाने तिचे डोके ठेचून निर्घृण खून केला. खेड पोलीस स्थानकाचे तत्कालीन पोलीस निरीक्षक अशोक जांभळे यांना याबाबत माहिती मिळताच आरोपी खोचरे याला अटक करून त्याच्याविरोधात कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल केला. खेडचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए. एस आवटे यांच्या न्यायालयात या खटल्याची सुनावणी होऊन परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे आरोपीला जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली. या खटल्यामध्ये एकूण १७ साक्षीदार तपासण्यात आले.  सरकार पक्षातर्फे अ‍ॅडव्होकेट मृणाल जाडकर यांनी बाजू मांडली.