scorecardresearch

परभणी जिल्ह्यात अतिरिक्त उसाचे आव्हान

उसाला तुरे लागूनही बराच काळ लोटला, तरी तो गाळपास जात नसल्याने शेतकरी धास्तावले असून पाणी तोडल्याने उभा ऊस आता शेतातच वाळू लागला आहे.

Sugarcane Juice Benefits

शेतकऱ्यांना धास्ती तर साखर कारखान्यांची दमछाक

परभणी : उसाला तुरे लागूनही बराच काळ लोटला, तरी तो गाळपास जात नसल्याने शेतकरी धास्तावले असून पाणी तोडल्याने उभा ऊस आता शेतातच वाळू लागला आहे. जिल्ह्यातील सहाही खासगी साखर कारखान्यांच्या क्षेत्रात अतिरिक्त उसाचे मोठे आव्हान असून यात साखर कारखान्यांचीही दमछाक होत आहे.

  जिल्ह्यात उसाची लागवड मोठय़ा प्रमाणावर झाली. जिल्ह्यातील उसाच्या लागवडीखालील क्षेत्र आणि साखर कारखान्यांची गाळपक्षमता यात मोठी तफावत आहे. जिल्ह्यातल्या सहाही खासगी साखर कारखान्यांकडून याबाबतचे नियोजन नीटपणे पार पाडले जात नसल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत. एवढेच नव्हे तर परजिल्ह्यातील ऊस गाळपासाठी प्राधान्य दिले जात आहे, अशाही तक्रारी शेतकरी करू लागले आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने या संदर्भात आक्रमक भूमिका घेतली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी घेतलेल्या बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण सूचना केलेल्या आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी घेतलेल्या बैठकीत साखर कारखान्यांनी आधी जिल्ह्यातील ऊस उत्पादकांचाच प्राधान्याने विचार करावा असे स्पष्ट निर्देश दिले आहेत.

जिल्ह्यात ३३ लाख टन ऊस आहे. त्यापैकी २५  लाख टन गाळप झाले आहे. अद्याप जिल्ह्यात शेकडो हेक्टरवर ऊस उभा आहे आणि शेतकऱ्यांना साखर कारखान्यावर चकरा माराव्या लागत आहेत. अधिकारी, कर्मचाऱ्यांची मनधरणी करावी लागत आहे. वेळप्रसंगी त्यांचे हात ओले करावे लागत आहेत अशा शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत. लवकर ऊसतोड होईल म्हणून शेतकरी पाणी बंद करत आहेत. त्यानंतरही ऊसतोडीचे नियोजन होत नसल्याने सध्या अनेकांच्या शेतात ऊस उभा असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.             

साखर कारखान्याकडे ऊस लागवडीच्या परिपूर्ण नोंदी नाहीत, ऊसतोड करण्याबाबतचे वेळापत्रक नाही त्यामुळे मोठय़ा प्रमाणात अजूनही ऊस उभा आहे. साखर कारखान्यांना ऊस गाळपासाठी जावा यासाठी शेतकऱ्यांना मोठय़ा प्रमाणात भुर्दंड सहन करावा लागत असेल तर आधीच ऊस लागवडीसाठी झालेला भरमसाठ खर्च पुन्हा ऊस कारखान्यांना घालण्यासाठी करावा लागणारा आटापिटा यामुळे सध्या जिल्ह्यात शेतकरी त्रस्त आहेत. या गाळपाबाबतचे नियोजन लवकर झाले नाही, तर शेतकऱ्यांमधील असंतोष व्यक्त होईल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

क्षमतेपेक्षा जास्त लागवड असेल तर त्यातून निर्माण होणाऱ्या प्रश्नांना केवळ साखर कारखानदारच जबाबदार आहेत असे नाही. सगळय़ांनीच ऊस जर ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये लावला असेल तर लाखो टन ऊस एकाच वेळी गाळपासाठी कसा जाईल? अशी भूमिका काही खासगी साखर कारखान्यांच्या व्यवस्थापनांनी घेतली आहे. यंदा जिल्ह्यातील उसाखालील क्षेत्रही कमी होण्याची आवश्यकता असल्याचेही या क्षेत्रातील जाणकारांचे म्हणणे आहे. साखरेला आता गुळाचा पर्याय असल्याने गुऱ्हाळे निर्माण करण्याची संधी आहे. या सर्व परिस्थितीचा विचार करू जाता जिल्ह्यात यंदा ऊस गाळपाचा पेच निर्माण झाल्याचे दिसून येत आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Additional sugarcane challenge farmers scared sugar mills ysh

ताज्या बातम्या