मुंबई : लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींच्या आचारसंहितेत अडकलेले राज्य सरकारचे आदिशक्ती पुरस्कार यंदा मार्च अखेर पर्यंत जाहीर केले जाणार आहेत.
महिलांच्या आर्थिक, सामाजिक, शैक्षिणक, आरोग्य क्षेत्रात उत्तम काम करणाऱ्या ग्राम, तालुका, जिल्हा, आणि राज्य पातळीवरील समित्यांना हे पुरस्कार देण्याची घोषणा महिला व बाल विकास विभागाने गेल्या वर्षी केली होती. या पुरस्कारांसाठी समिती स्थापन करण्याचे आदेश महिला विकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिले आहेत. गाव ते राज्य पातळीवर ह्या समित्या स्थापन केल्या जात आहेत. एक ते दहा लाख रुपये पुरस्काराची रक्कम असून तालुका जिल्हा आणि राज्य पातळीवर प्रत्येकी तीन पुरस्कार दिले जातील. यासाठी दहा कोटी ५० लाखाची तरतूद करण्यात आली आहे.
राज्याची ६० टक्के लोकसंख्या ही महिला व बालकांची आहे. या सर्वाधिक लोकसंख्येच्या समस्यांचे निवारण अद्याप झालेले नाही. कृपोषण, बालमृत्यू, मातामृत्यू सारख्या समस्या आजही राज्याला भेडसावत आहेत. लिंगभेद विचारसरणी ग्रामीण भागात घट्ट आहे. बालविवाह मुक्त समाज निर्माण झालेला नाही.
महिलांवर लैगिक, शाररिक अत्याचार सुरु आहेत. हिंसाचार मुक्त कुटुंब निर्माण करण्याचे एक मोठे आव्हाण समाजासमोर आहेत. महिला नेतृत्वाला सक्षम करुन पंचायत राज पध्दतीमध्ये महिलांचा जास्तीत जास्त समावेश करुन घेण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. महिलांसाठी शासनाने अनेक उपक्रम, योजना सुरु केलेल्या आहेत. त्या तळागाळापर्यंत पोहचत नाहीत अशी तक्रार आहे.
महिलांच्या सर्वांगिण विकासासाठी प्रयत्न करणे हा या समित्या स्थापन करणामागे उद्देश आहे. ग्राम पातळीवर आठ जणांची समिती स्थापन केली जाणार आहे. यात ग्रामसभेने निवडलेली महिला प्रतिनिधी, महिला व बाल विकास क्षेत्रात कार्यरत असलेला पुरुष प्रतिनिधी, सामाजिक क्षेत्रात काम करणारा पुरुष प्रतिनिधी, आशा सेविका, महिला शिक्षिका, तलाठी, पोलिस यापैकी एक, ग्रामसेवक, पोलिस पाटील आणि अंगणवाडी सेविका अशी आठ जणांची समिती नेमली जाणार आहे.
अशा समित्यांना अदिशक्ती पुरस्कार दिला जाणार आहे. ग्राम पातळीवरील समित्यांची रचना तालुका, जिल्हा, विभाग आणि राज्य पातळीवर केली जाणार आहे. तेथील काही सदस्य बदलले जाणार आहेत. राज्य पातळीवरील समितीत महिला विकास मंत्री राहणार आहेत. महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी या पुरस्कारांची घोषणा गेल्या वर्षी मे महिन्यात केली गेली होती पण नंतर टप्याटप्याने लागलेल्या विविध प्रकारच्या निवडणुकामुळे हे पुरस्कार रखडले. ते यंदा मार्च अखेर पर्यत दिले जाणार आहेत.

