अलिबाग– राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यावर होत असलेल्या टीकेला राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी उत्तर दिले आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर विरोधी पक्षांतील नेत्यांकडून प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांना लक्ष केले जात आहे. याबाबत आदिती तटकरे यांना विचारणा केली असता त्यांनी टीकाकारांना सडेतोड उत्तर दिले आहे.
अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ताब्यात घेण्याचा प्रयत्न प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी केल्याचा आरोप केला जात आहे. रोहीत पवार यांच्याकडून सातत्याने तटकरे यांना लक्ष केले जात आहे. समाजमाध्यमांवर यासदर्भात मोठ्या प्रमाणावर टीका होत आहे. या टीकेला राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी पहिल्यांदाच उत्तर दिले आहे. कोणी कितीही टिका टिप्पणी केली तरी तटकरे कुटूंब आणि अजितदादांच्या कुटूंबाच्या संबधात वितुष्ट येणार नाही. आम्ही यापुढील काळातही पवार कुटूंबाच्या पाठिशी ठामपणे उभे राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
तटकरे कुटूंबाचे आणि पवार यांच्या कुटूंबाचे जिव्हाळ्याचे संबंध राहीले आहेत. पवार कुटूंबातील प्रत्येकाशी सुरवातीच्या काळापासून आमचे चांगले संबध राहीले आहेत. सुरवातीपासून अतिशय समन्वयाने त्यांच्या पक्षातील कार्यकर्ते म्हणून आम्ही काम करत आलो आहोत. गेल्या ३० ते ३५ वर्षांपासून अजितदादांचे जवळचे सहकारी म्हणून तटकरे साहेब काम करत आले आहेत. दोघांची घनिष्ठ मैत्री होती. यापूढेही ती कायम राहील. कोणाला पटो अथवा न पटो आम्ही आदरणीय सुनेत्राकाकीं सोबत यापुढील काळात कायम राहणार आहोत. त्यांना पाठबळ देण्याच्या दृष्टीकोनातून जे काही करणे शक्य आहे ते आम्ही करत राहणार आहोत असेही तटकरे यांनी स्पष्ट केले आहे. त्या रोहा येथे माध्यमांशी बोलत होत्या.
पालकमंत्री पदाबाबत काय म्हणाल्या आदिती तटकरे….
विधानसभा निवडणुकीनंतर महायुतीची सत्ता स्थापन होऊन दीड वर्ष होत आले तरी रायगड जिल्ह्याचा पालकमंत्री पदाचा तिढा सुटू शकलेला नाही. शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस दोन्ही पक्ष रायगडच्या पालकमंत्री पदासाठी आग्रही असल्याने, गेली दीड वर्ष जिल्ह्याचे पालकमंत्रीपद रिक्त ठेवण्यात आले आहे. पालकमंत्री पदाबाबत महायुतीत एकमत होत नसल्याने, या संदर्भातील निर्णय होऊ शकलेला नाही. या पार्श्वभूमीवर माध्यमांशी संवाद साधतांना आदिती तटकरे यांनी महत्वाचे विधान केले आहे. रायगडच्या पालकमंत्रीपदाचा निर्णय लवकरच घेतला जाईल, मख्यमंत्री आणि दोन्ही मुख्यमंत्री या संदर्भातील निर्णय योग्यवेळी घेतील. तोवर निधीच्या बाबतीत रायगड जिल्ह्यावर कुठलाही अन्याय होणार नाही याची दक्षता वेळोवेळी घेतली जात आहे. महायुतीचे सर्व नेते यासाठी प्रयत्नशील आहेत असेही त्या म्हणाल्या.
