अलिबाग– गेल्या दोन वर्षांपासून रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा कायम आहे. शिवसेना शिदे गटाचे मंत्री भरत गोगावले आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आदिती तटकरे यांच्यात या पदावरून जोरदार रस्सीखेच सुरू आहे. दोन्ही पक्षांच्या वादामुळे जिल्ह्याचे पालकमंत्रीपद स्थगित ठेवण्यात आले आहे, या पार्श्वभूमीवर राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी महत्वाचे विधान केले आहे.
विधान सभा निवडणुकीनंतर जिल्ह्यातील दोन आमदारांची राज्याच्या मंत्रीमडळात वर्णी लागली. शिवसेना शिंदे गटाकडून भरत गोगावले यांना तर राष्ट्रवादी काँग्रेसककडून आदिती तटकरे यांना मंत्रीमंडळात स्थान देण्यात आले. शिवसेना शिंदे गटाचा विरोध डावलून रायगडचे पालकमंत्रीपद आदिती तटकरे यांना देण्याची घोषणा करण्यात आली. मात्र शिवसेनेच्या आक्रमक पावित्र्यामुळे अवघ्या २४ तासात या निर्णयाला स्थगिती दिली गेली. तेव्हा पासून दोन वर्ष होत आली तरी रायगडच्या पालकमंत्रीपद स्थगित ठेवण्यात आले आहे. रायगड जिल्हा गेली दोन वर्ष पालकमंत्रीपदा विनाच वाटचाल करतो आहे. त्यामुळे पालकमंत्री पदाचा तिढा कधी सुटणार याची उत्सुकता सर्वांना लागून राहीली आहे.
विधानपरिषदेच्या कोकण स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी नुकतीच निवडणूक प्रक्रीया पार पडली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिकेत तटकरे बिनविरोध निवडून आले. शिवसेना शिंदे गट या जागेसाठी आग्रही होता. कोकणात सर्वाधिक स्थानिक स्वराज्य संस्थाचे सदस्य शिवसेना शिंदे गटाचे असल्याने ही जागा शिवसेना शिंदे गटासाठी सोडण्यात यावी अशी मागणी केली जात होती. पण शिवसेना शिंदे गटाचा विरोध डावलून ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनिकेत तटकरे यांना सोडण्यात आली. शिवसेनेच्या शिंदे गटाने रायगडच्या पालकमंत्रीपदासाठी या जागेचा आग्रह सोडला. आणि राष्ट्रवादी काँग्रेसपूढे नमते घेतले.
या निवडणुकीच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि शिवसेना नेत्यांची एक संयुक्त बैठक झाली होती. या बैठकीनंतर विधान परिषदेची जागा सोडण्याच्या बदल्यात तटकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून रायगडचे पालकमंत्रीपद शिवसेना शिंदेगटासाठी सोडण्यास अनुकूलता दर्शवली होती. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री एकत्र बसून तो निर्णय घेतील असेही जाहीर केले होते. त्यामुळे अनिकेत तटकरे यांचा पुन्हा विधान परिषदेवर जाण्याचा मार्ग मोकळा झाला होता.
आता निवडणुकीनंतर शिवसेनेकडून रायगडच्या पालकमंत्रीपदासाठी दबाव वाढविण्यात आला आहे. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी निवडणूकीत जे ठरले होते. त्याची पूर्तता करून रायगडचे पालकमंत्रीपद भरत गोगावले यांच्याकडे सोपवायला हवे अशी मागणी केली आहे. आमदार निलेश राणे, आमदार महेंद्र थोरवे यांनीही रायगडचे पालकमंत्रीपद शिवसेना शिंदे गटाकडे देण्याची मागणी केली आहे. आता शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी तटकरेंवर टीका करत रायगडचे पालकमत्रीपद तात़डीने गोगावले यांच्याकडे देण्याची मागणी केली आहे. या पार्श्वभूमीवर राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री आणि पालकमंत्री पदाच्या दावेदार आदिती तटकरे यांनी आपली भूमिका पहिल्यादाच मांडली आहे.
रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री पद भरत गोगावले पालकमंत्री झाले तरी त्यांना आपल्या शुभेच्छा आहेत. पालकमंत्री हे केवळ एक पद आहे. पण जिल्ह्यात दोन मंत्री आहेत. त्यामुळे या मंत्रीपदाचां वापर करून जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने पुढे गेले पाहीजे असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री या संदर्भातील निर्णय घेतली. जिल्हा आणि जिल्ह्याचा विकास हा अधिक महत्वाचा आहे. आणि लोकप्रतिनिधी म्हणून मी त्याला अधिक महत्व देत असल्याचेही तटकरे यांनी स्पष्ट केले.
