अहिल्यानगर:शेतकऱ्यांपर्यंत जी मदत पोहोचायला हवी ती पोहोचत नाही, राज्यातील जनतेला प्यायला पाणी मिळत नाही तर दुसरीकडे अशाही परिस्थितीत राज्य सरकारची ‘इव्हेंटबाजी’ सुरू आहे, अशी टीका युवासेनाप्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी केली आहे.

जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या वतीने (ठाकरे गट) कुकाणा (नेवासा) व पारनेर येथे शेतकरी मदत केंद्र सुरू करण्यात आले आहेत. त्याचे लोकार्पण आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते माध्यमांशी बोलत होते. या केंद्राच्या माध्यमातून ठाकरे गटाचे पदाधिकारी शेतकऱ्यांना मदत व मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी आमदार अंबादास दानवे, आमदार सुनील शिंदे उपस्थित होते. कुकाणा येथील कार्यक्रमावेळी ज्येष्ठ नेते विश्वासराव आठरे, जिल्हा परिषदेचे माजी सभापती सुनील गडाख, मुळा शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष उदयन गडाख, माजी सभापती सुनिता गडाख, जिल्हाप्रमुख राजेंद्र दळवी व रामदास गोल्हार आदी उपस्थित होते. कुकाणा येथील कार्यक्रमानंतर ठाकरे पत्रकारांशी बोलत होते.

खोक्यातून खासदार, आमदार विकत घेताना त्यांना तात्पुरती मदत न देता कायमची मदत दिली जाते. मग शेतकऱ्यांनाच का तात्पुरती मदत करता असा प्रश्न आदित्य ठाकरे यांनी भाजपला उद्देशून केला. आदित्य ठाकरे म्हणाले, राज्यात भीषण दुष्काळ पडला आहे. ३०० हून अधिक तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. मात्र सरकार शेतकऱ्यांना पाच हजारांची तुटपुंजी मदत करत आहे. शेतकऱ्यांना जी मदत अपेक्षित आहे, ती सरकारने द्यावी.

पाच हजार रुपयांनी शेतकऱ्यांना काहीही मदत होणार नाही, मोठमोठ्या शासकीय कार्यक्रमावर कोट्यावधींचे खोके खर्च केले जात आहेत. पण शेतकऱ्यांना जी मदत पोहोचायला हवी ती पोहोचत नाही. एका बाजूला जनतेला प्यायला पाणी नाही तर दुसऱ्या बाजूला इव्हेंटबाजी सुरू आहे, अशीही टीका त्यांनी केली. तुम्ही विमानातून फिरा, गाडीतून फिरा पण शेतकऱ्यांची हाल पहा, असाही टोला त्यांनी लगावला.

शेतकऱ्यांचे जेवढे नुकसान झाले तेवढे विम्याचे पैसेही आलेले नाहीत. गेल्यावर्षीचे पैसेही मिळाले नाहीत सरकारने कर्जमाफी जाहीर केली पण त्याचे पुढे काय झाले, कर्जमाफीऐवजी शेतकऱ्यांना कर्जमुक्ती हवी आहे असेही ठाकरे म्हणाले.

शनिशिंगणापूर येथे शनिदर्शन

आदित्य ठाकरे यांनी शनीशिंगणापूर येथे शनिमूर्तीचे दर्शन घेऊन तैलाभिषेक केला. त्यानंतर सोनई येथे माजीमंत्री शंकरराव गडाख यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट देत गडाख कुटुंबीयांशी संवाद साधला. यावेळी आमदार दानवे, आमदार सुनील शिंदे उपस्थित होते. आदित्य ठाकरे यांचा यावेळी सन्मान करण्यात आला. उदयन गडाख यांनी माजीमंत्री गडाख यांचा लेख समाविष्ट असलेला ऋतुरंग दिवाळी अंक ठाकरे यांना भेट दिला.