मुंबई : पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रणाची सक्ती करण्याच्या केंद्र सरकारच्या धोरणाचा पुनर्विचार करून वाहनधारकांना १०० टक्के शुद्ध पेट्रोल आणि इथेनॉल-मिश्रित पेट्रोल असे दोन्ही पर्याय उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी शिवसेना नेते ( ठाकरे) आमदार आदित्य ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्राद्वारे केली आहे.

आदित्य ठाकरे यांनी लिहिलेल्या पत्रात देशातील लाखो वाहनधारक, विशेषतः युवक आणि मध्यमवर्गीय नागरिकांच्या वाढत्या चिंतेकडे लक्ष वेधले आहे. वाहन खरेदीसाठी अनेक कुटुंबे अनेक वर्षांची बचत करतात किंवा कर्ज काढून ईएमआय भरतात. अशा परिस्थितीत वाहन उत्पादकांनी दिलेली कामगिरी आणि इंधन कार्यक्षमता (मायलेज) मिळावी, अशी ग्राहकांची अपेक्षा असते, असे त्यांनी नमूद केले आहे.

वाहनांच्या कार्यक्षमतेवर परिणाम

पत्रात नमूद केल्याप्रमाणे, पेट्रोलमधील इथेनॉलचे प्रमाण वाढल्यानंतर अनेक वाहनधारक कमी मायलेज मिळत असल्याची आणि वाहनाच्या कार्यक्षमतेवर परिणाम होत असल्याची तक्रार करत आहेत. देशातील मोठ्या प्रमाणावरील वाहने जास्त इथेनॉल मिश्रित इंधनासाठी मूळतः तयार करण्यात आलेली नसल्यामुळे त्याचा परिणाम वाहनांवर होत असल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे वाहनधारकांना कोणताही पर्याय न देता या धोरणाचे परिणाम सहन करावे लागत असल्याची भावना नागरिकांमध्ये असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

ऊस लागवड आणि पाणीटंचाईची समस्या

इथेनॉल उत्पादनासाठी मोठ्या प्रमाणावर ऊस लागवड वाढत असल्याबाबतही आदित्य ठाकरे यांनी चिंता व्यक्त केली आहे. ऊस हे देशातील सर्वाधिक पाणी लागणाऱ्या पिकांपैकी एक असून अनेक राज्यांमध्ये पाणीटंचाईची समस्या गंभीर आहे. त्यामुळे इथेनॉल उत्पादनासाठी ऊस लागवडीवर भर देणे दीर्घकालीन दृष्टीने शाश्वत आहे का, असा प्रश्न नागरिक उपस्थित करत असल्याचे त्यांनी पत्रात नमूद केले आहे.

धोरण पारदर्शक हवे

या धोरणाचा लाभ काही विशिष्ट कंपन्या आणि उद्योगसमूहांना अधिक होत असल्याची जनमानसात भावना असल्याचेही पत्रात नमूद करण्यात आले आहे. ही धारणा योग्य असो वा अयोग्य, सरकारने या सर्व मुद्द्यांवर पारदर्शकपणे भूमिका स्पष्ट करणे आवश्यक असल्याचे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.

ग्राहकांना निवडीचा अधिकार द्यावा

अनेक देशांमध्ये ग्राहकांना त्यांच्या वाहनानुसार इंधन निवडण्याचे स्वातंत्र्य उपलब्ध असल्याचा उल्लेख करत भारतातही अशीच ग्राहकाभिमुख व्यवस्था लागू करण्याची मागणी त्यांनी केली आहे. त्यानुसार पेट्रोल पंपांवर १०० टक्के शुद्ध पेट्रोल आणि इथेनॉल-मिश्रित पेट्रोल हे दोन्ही पर्याय उपलब्ध करून द्यावेत, असे त्यांनी सुचविले आहे.

मध्यमवर्गीय आणि वाहनधारकांच्या हिताचा निर्णय घ्यावा

ग्राहकांना पर्याय उपलब्ध करून दिल्यास विद्यमान वाहनधारकांची गैरसोय टळेल, ग्राहकांच्या निवडीचे स्वातंत्र्य अबाधित राहील आणि सरकारच्या धोरणांबाबत जनतेचा विश्वास अधिक दृढ होईल, असे आदित्य ठाकरे यांनी पत्रात नमूद केले आहे. देशातील मेहनती मध्यमवर्गीय, युवक आणि कोट्यवधी वाहनधारकांच्या हिताचा विचार करून केंद्र सरकारने या मागणीचा सकारात्मक विचार करावा, अशी विनंती त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केली आहे.