एलॉन मस्कच्या मदतीला आदित्य ठाकरे गेले धावून; वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांना पत्र लिहित केली ‘ही’ मागणी

सध्या अनेक राज्ये टेस्ला कंपनी आपल्या राज्यात आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

जगातली सर्वात मोठी वाहन उत्पादक कंपनी म्हणून ओळख असलेल्या टेस्ला या कंपनीला आपल्या राज्यात आणण्यासाठी अनेकांची धडपड सुरू आहे. महाराष्ट्राचे पर्यटन आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हेही आता यासाठी प्रयत्न करत असल्याचं दिसून येत आहे. देशात इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढवण्यासंदर्भात आदित्य ठाकरे यांनी केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांना पत्र लिहिलं आहे.

आदित्य ठाकरे यांनी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना पत्र लिहून पुढील महिन्यात सादर होणाऱ्या आगामी केंद्रीय अर्थसंकल्प २०२२-२३ साठी राज्याच्या अपेक्षांवर प्रकाश टाकला आहे. भारतातील इलेक्ट्रिक वाहनांचे आयात शुल्क कमी करावे, अशी सूचना ठाकरे यांनी केली आहे. भारतात, टेस्लाने २०२१ मध्येच इलेक्ट्रिक वाहनांवरील आयात शुल्कात कपात केली आहे.

गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये एलॉन मस्क यांनी सांगितले होते की, त्यांना त्यांचे इलेक्ट्रिक वाहन भारतात लॉन्च करायचे आहे. परंतु त्यांच्या आयात शुल्कावर जगात सर्वाधिक शुल्क आकारले जात आहे. याबाबत केंद्र सरकारने अद्याप कोणतेही वक्तव्य केलेले नाही. भारत सरकारला आधी टेस्लाची उत्पादन योजना जाणून घ्यायची आहे, त्यानंतर आयात शुल्क कमी करता येईल.

सध्या अनेक राज्ये टेस्ला कंपनी आपल्या राज्यात आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत. यापूर्वी तेलंगणाच्या मंत्र्यांनीही ट्वीट करत एलॉन मस्कला आपल्या राज्यात आमंत्रित केलं होतं. तर राज्याचे मंत्री जयंत पाटील यांनीही एलॉन मस्कला ट्वीट करत महाराष्ट्र सरकारकडून आपल्याला लागेल ते सहकार्य केलं जाईल, असं आश्वासन दिलं होतं आणि महाराष्ट्रात आपला प्रकल्प सुरू करण्याचं आमंत्रण दिलं होतं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Aditya thackeray electric vehicles nirmala sitaraman elon musk tesla vsk

Next Story
१५ ते १८ वयोगटातील मुलांचे आता शाळांमध्येही लसीकरण; मंत्रीमंडळाच्या बैठकीनंतर निर्णय
फोटो गॅलरी