अतिवृष्टीमुळे राज्यात अनेक जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली होती. मुसळधार पावसामुळे कोकणात दरड कोसळण्याचा घटना घडल्या. रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यात असलेल्या तळीये गावावर दरड कोसळली. या दुर्घटनेत जीवितहानी आणि मालमत्तेचंही नुकसान झालं. पावसाने उसंत घेतल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पूरग्रस्त भागाचा दौरा केला. त्याचबरोबर केंद्रीय मंत्री नारायण राणे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी तळीये गावाला भेट दिली. यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडलं. “राज्य सरकारची लोकं भेटत नाहीत, बोलत नाहीत. आता कुठे घरातून डिस्चार्ज झाला आहे. आता फिरत आहेत”, अशा शब्दात राणे यांनी मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केलं. यावर आता पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी सणसणीत उत्तर दिलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“आपण विरोधकांच्या टीकेवर लक्ष केंद्रीत केलं तर आपण काहीच करू शकणार नाही. आता आपल्याला राजकारणाच्या पलीकडे जाऊन काम करणं गरजेचं आहे. लोकांच्या पाठी उभं राहणं गरजेचं आहे”, असं उत्तर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिलं.

चिपळूण येथील पूरग्रस्त भागाची पाहणी केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी स्थानिक प्रशासनासोबत आढावा बैठक घेतली. ”सरकार म्हणून जे काही करणं आवश्यक आहे ते आम्ही करू, नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत केली जाईल. मदत पुरवठा होताना कोणत्याही तांत्रिक अडचणी येऊ देणार नाही.जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्तांना तशा सूचना देखील दिल्या गेल्या आहेत. एकदा संपूर्ण आढावा आला की, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, सातारा, सांगली, कोल्हापूर या ठिकाणचा सगळा एकत्रित आढावा घेऊन आर्थिक मदत देखील दिली जाईल. असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज जाहीर केलं आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aditya thackeray gave reply to the critics that the cm does not go out of the house rmt
First published on: 25-07-2021 at 15:43 IST