Aditya Thackeray’s visit to Mohit Kamboj’s residence for daughter’s birthday : भारतीय जनता पक्षाचे नेते मोहित कंबोज यांनी महाराष्ट्रातील विरोधी पक्षांवर सातत्याने टीका केलेली सर्वांनीच ऐकली आहे. शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षातील नेत्यांवर त्यांनी नियमित आगपाखड केली आहे. विविध मुद्द्यांच्या आधारे या नेत्यांन टार्गेट केलं गेलं. मात्र, आता नवे प्रकरण समोर येत आहे. मोहित कंबोज यांच्या मुलीच्या वाढदिवसाला चक्क आदित्य ठाकरे उपस्थित होते. ज्यांनी कायम एकमेकांवर टीकास्त्र सोडलं, असे दोन नेते खासगी कार्यक्रमात भेटतात यावरून आता राज्याच्या राजकारणात वेगळीच चर्चा सुरू झाली आहे. या दोन्ही नेत्यांमधील संघर्ष संपला असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. दरम्यान, यावरून शिवसेनेच्या (उद्धव ठाकरे) उपनेत्या सुषमा अंधारे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

सुषमा अंधारे काय म्हणाल्या?

मोहित कंबोज यांच्या मुलीच्या वाढदिवसाला आदित्य ठाकरे गेले होते, यावरून सुषमा अंधारे यांना विचारण्यात आलं. त्या म्हणाल्या, सुतावरून स्वर्ग गाठत आहोत. राजकारण वेगळी गोष्ट आहे, सुख-दु:ख वेगळी गोष्ट आहे. कंबोज यांच्या मुलीशी आमचं वैर असण्याचं काही कारण नाही.”

त्या पुढे म्हणाल्या, “जगात इतक्या उलथापालथी होत असताना त्यावर चर्चा करण्याचं सोडून आपण यावर का अडलोय? कंबोज यांना आम्ही आधीही विरोध केला, यापुढेही करू. आमचं नेतृत्व आणि आमच्या कुटुंबीयांचं संस्कार चांगले आहेत. युद्धशास्त्रात कुटुंबीयांना कधीही मध्ये आणायचं नसतं.”

संजय राऊतांनीही दिली प्रतिक्रिया

“कोणी एखाद्या शुभ कार्याला बोलावलं असेल तर जायाला हरकत नाही, असं मला वाटतं. मंगल कार्यात बोलावलं असेल तर तेवढ्यापुरती कटुता दूर ठेवून कोणी गेलं असेल तर अशा प्रकारचे प्रश्न विचारणं किंवा बातम्या देणं मला योग्य वाटत नाही. संघर्ष कधी संपत नाही. त्या कार्यक्रमाला अनेक लोक उपस्थित होते. त्यामध्ये थोड्यावेळापुरते आदित्य ठाकरे उपस्थित होते”, असं संजय राऊत म्हणाले.